पक्षश्रेष्ठींकडून गेहलोत यांना सर्वाधिकार; सचिन पायलटांना काँग्रेसचे दरवाजे बंद?

सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसने नाकारल्यास सचिन पायलट काय करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.   

Updated: Jul 13, 2020, 06:29 PM IST
पक्षश्रेष्ठींकडून गेहलोत यांना सर्वाधिकार; सचिन पायलटांना काँग्रेसचे दरवाजे बंद? title=

नवी दिल्ली: राजस्थानमधील सत्तानाट्य आता निर्णायक वळणवार पोहोचले असून काँग्रेस पक्षाकडून सचिन पायलट यांच्याविरोधात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत जयपूरमध्ये काँग्रेसच्या १०९ आमदारांची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा ठराव मंजूर झाला. यानंतर काँग्रेसच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. 

काँग्रेसने राजस्थान वाचवले पाहिजे, अन्यथा देशभरात वेगळा संदेश जाईल- राऊत

त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या सरकारवरचे संकट तुर्तास टळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे पक्षाकडून बंडाचे निशाण फडकावणाऱ्या पायलट यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींकडून गेहलोत यांना सर्वाधिकार देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सचिन पायलट यांच्या परतीचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसने नाकारल्यास सचिन पायलट काय करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

अशोक गेहलोत यांनी आज जयपूरमध्ये केलेले शक्तीप्रदर्शन सचिन पायलट यांच्यासाठी इशारा मानला जात आहे. पायलट यांच्याकडे गेहलोत यांच्यापेक्षा कमी आमदारांचे पाठबळ असल्याचे सिद्ध झाल्याने आता पक्षातील त्यांचे स्थान डळमळीत झाल्याची चर्चा आहे. 

तर दुसरीकडे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनी सचिन पायलट यांची समजूत काढल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते. त्यामुळे सचिन पायलट यांचे बंड शमल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगामी काळात सचिन पायलट यांचे राजकीय भवितव्य काय असणार, हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.