Young Man Killed 5 Family Members: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मैनपुरीमध्ये (Mainipur) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने भावाच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी भावासहीत त्याची नवविवाहित पत्नी, भावोजी, मित्र आणि धाकटा भाऊ अशा एकूण 5 नातेवाईकांची हत्या केली आहे. कुऱ्हाडीने हल्ला करुन या तरुणाने आज (24 जून) पहाटे नातेवाईकांची निघ्रृण हत्या केली. नातेवाईकांवर हल्ला केल्यानंतर या तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली. त्याने मामी आणि पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्या वाचल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरुन गेलं आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे 4 ते 5 दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. किशनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोकुलपूर आरसारा गावामध्ये हा प्रकार घडला. शिववीर यादव असं नातेवाईकांची हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. शिववीरच्या धाकट्या भावाचं लग्न शुक्रवारी झालं होतं. 28 वर्षीय शिववीरने त्याचा भाऊ भुल्लन यादव (25), कालच लग्न झालेला भाऊ सोनू यादव (21), सोनूची पत्नी सोनी (20 वर्ष), भावोजी सौरभ (22 वर्ष) आणि मित्र दीपकवर कुऱ्हाडीने हल्ला केला. हे सर्वजण झोपेत असताना शिववीरने कुऱ्हाडीने हल्ला करुन या सर्वांचा जीव घेतला. पत्नी डॉली (24) आणि मामी सुषमा यांच्यावरही हल्ला करुन त्यांना जखमी केलं. त्यानंतर शिववीरने गावठी पिस्तुलने स्वत:वर गोळी झाडली. सुभाषचा जागीच मृत्यू झाला.


मोठा बंदोबस्त


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत व्यक्तींच्या मृतदेहांचं शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घटनास्थळी अनेक स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम दाखल झाल्या असून तपास वेगाने सुरु आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 


नोएडामध्ये करायचा काम, लग्नासाठी गावी आलेला


शुक्रवारी शिववीरचं लग्न झाल्यानंतर सर्वजण घरी परतले. त्यानंतर रात्री शिववीरने अचानक घरात झोपलेल्या नातेवाईकांवर हल्ला केला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघी गंभीर जखमी झाल्यात. पोलीस अधीक्षकांनी शिववीरने हा हल्ला नेमका का केला याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही असं सांगितलं. शिववीरला काही मानसिक आजार होता का, त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती का यासंदर्भातील माहिती पोलीस गोळा करत आहेत. शिववीर हा नोएडामध्ये काम करायचा. लग्नानिमित्त तो मूळ गावच्या घरी आला होता.