तुमच्या पीएफची रक्कम होईल दुप्पट, पुढच्या तीन दिवसांत करा हे काम
तुम्ही तुमच्या कंपनीशी बोलून तुमचे पीएफ योगदान वाढवू शकता.
मुंबई : नव्या आर्थिक वर्षाचा पहिला महिना म्हणजे एप्रिल हा नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. कारण याच महिन्यात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत बदल करतात. पण नोकरदार वर्ग या संधीचा फायदा घेऊन पीएफची रक्कम दुप्पट करु शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या कंपनीशी बोलून तुमचे पीएफ योगदान वाढवू शकता. पण अशामुळे तुमच्या हातात येणाऱ्या पगाराची रक्कम कमी होते.
जर तुमच्या कंपनीने पीएफ योगदान वाढवले तर पीएफ खात्यात दरमहा जास्त पीएफ फंड गोळा होईल. जर सध्या कमावण्याच्या दिवसात ही रक्कम जास्तच राहू दिली तर निवृत्तीवेळी तुम्हाला मिळणारी रक्कम दुप्पट होऊ शकते. सध्या एम्प्लॉईज प्रॉईडंट फंड म्हणजेच EPF वर 8.65 टक्के व्याज मिळते. पीएफ योगदान वाढवल्याने तुम्हाला पीएफ रक्कमेवर मिळणारे व्याज देखील जास्त मिळू शकते. जर कोणताही कर्मचारी आपली मासिक पीएफ रक्कम दुप्पट करेल तर त्याला मिळणारी रक्कम देखील दुप्पटच होईल.
समजा सध्याच्या बेसिक सॅलरीवर तुमचा 12 टक्के पीएफ कट होतो. पण तुम्ही हे योगदान 24 टक्के केलेत तर त्याचा पीएफ फंड देखील वाढणार आहे. पीएफ फंड डबल झाल्यास तुम्हाला व्याज देखील डबल मिळेल. पीएफ व्याज हे चक्रवाढ व्याजानुसार मोजले जाते. याला कंपाऊंडींग इंट्रेस्ट देखील म्हटले जाते. अशावेळी फंड दुप्पट होतो आणि दरवर्षी व्याजाचा फायदा देखील मिळतो. अशा पद्दधतीने तुमच्या निवृत्ती पर्यंत मोठी रक्कम गोळा होते.
काय आहे नियम ?
EPFO च्या नियमानुसार कर्मचारी कंपनीला कळवून आपले पीएफ योगदान वाढवू शकतो. एम्प्लॉई प्रॉविडंट फंड एक्टनुसार ही सुट देण्यात आली आहे. प्रॉविडंट फंडमध्ये बेसिक सॅलरी आणि डीएच्या 12 टक्के कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होतात. इतकाच हिस्सा कंपनीतर्फे कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केला जातो. कोणताही कर्मचारी आपल्या महिन्याच्या योगदानाला बेसिक सॅलरीच्या शंभर टक्के इतका करु शकतो.