CKS vs KKR: धोनीची आयपीएलमधून निवृत्ती? कोलकाता विरुद्धच्या पराभवानंतर मैदानात नेमकं काय घडलं?
CKS vs KKR Highlights : आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता संघाने चेन्नई टीमवर 6 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या जर तरच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मात्र चेन्नईच्या पराभवानंतर धोनीने चाहत्यांचे आभार मानत एकदंरीत निवृत्तीचे संकेतच दिले.
CSK vs KKR Highlights: आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 61 वा लीग सामना संपल्यानंतरही आतापर्यंत कोणत्याही संघाला प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. रविवारी पार पडलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 6 गडी राखून विजय मिळवला आणि प्लेऑफमधील आपले स्थान कायम राखले. या सामन्यानंतर केकेआरचा (Kolkata Knight Riders) संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. कोलकाताचे 6 विजयांसह 12 गुण असून संघाचा नेट रननेट -0.256 आहे. तर दुसरीकडे चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा या 16 व्या हंगामातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना होता. त्यामुळे कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आपल्या संघासोबत संपूर्ण मैदानात फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले.
चेन्नईचा हा त्यांच्या घरच्या मैदानावरील अखेरचा सामना होता. या सामन्यात चेन्नईला केकेआरकडून (kkr vs csk) पराभव पत्कारावा लागला असला तरी चाहते जास्त निराश नव्हते. या गोष्टीला कारण म्हणजे महेंद्रसिंह धोनी. कारण रविवारचा (14 मे 2023) चेन्नईचा अखेरचा सामना होता. त्यामुळे धोनी सामना संपल्यानंतर मैदानावर आपल्या चाहत्यांना काही भेटवस्तू देत होता. त्याचवेळी भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेले सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे धोनीच्या जवळ गेले आणि त्यांनी जी गोष्ट केली त्यामुळे क्रिकेट चाहते खूश तर झालेच पण धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेतोय की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला.
कोलकाता विरुद्ध चेन्नईचा सामना संपल्यानंतर केकेआरचा रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती (Rinku Singh and Varun Chakraborty) या दोघांनी पहिले धोनीला गाठले. या दोघांनी जर्सीवर धोनीचा ऑटोग्राफ घेतला. यानंतर धोनी आणि चेन्नईच्या संपूर्ण संघाने मैदानात फिरा मारायला सुरुवात केला. धोनीसह चेन्नईचे खेळाडू चाहत्यांना काही वस्तू भेट म्हणून देत होते. या दरम्यानटीम इंडियाचे माजी कर्णधार आणि कॉमेंटेटर सुनील गावस्कर मैदानात आले. गावसकरांनी धोनीकडून थेट आपल्या शर्टावर ऑटोग्राफ घेतला. गावसकरांच्या या कृतीमुळे धोनीची निवृत्तीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या होत आहे.
सुनील गावसकरांनी याआधी अनेकदा एमएस धोनीच्या खेळीचे त्याच्यातील नेतृत्व गुणांचे कौतुक केले आहे. सध्या या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहेत.