`कोणीतरी धोनीला सांगायला हवं की, किमान...`; इरफान पठाण कॅप्टन कूलवर संतापला
Irfan Pathan Slams Dhoni: यंदाचं आयपीएल हे धोनीचं शेवटचं आयपीएल असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच संघाचं नेतृत्व यंदाच्या पर्वात ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. असं असतानाच आता इरफान धोनीवर संतापला आहे.
Irfan Pathan Slams Dhoni: भारताचा माजी वेगवान गोलंदाजा इरफान पठाणने चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीवर निशाणा साधला आहे. रविवारी झालेल्या चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्सदरम्यानच्या सामन्यामध्ये धोनी चक्क 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्याने इरफान पठाण चांगलाच संतापल्याचं दिसून आलं. धरमशाला येथील मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदाच धोनी त्याच्या टी-20 करिअरमध्ये 9 व्या क्रमांकावर खेळायला आला आणि शुन्यावर बाद झाला.
धोनी शून्यावर बाद
पंजाबचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने धोनीला शून्य धावांवर क्लिन बोल्ड केलं. धोनी एवढ्या तळाशी फलंदाजीला आल्याने संतापलेल्या इरफानने धोनीला सुनावलं आहे। धोनीने वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू म्हणून जबाबदारी स्वीकारुन आधीच्या क्रमांकावर फलंदाजीस यावं असं म्हटलं आहे. "धोनीने 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करणं हे सीएसकेसाठी फायद्याचं नाही. याचा संघाला काहीच फायदा होत नाही. मला माहितीये की तो 42 वर्षांचा आहे. मात्र त्याची कामगिरी आजही उत्तम आहे. त्याने जबाबादीर घेऊन वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं," असं इरफान पठाण म्हणाला.
धोनीच्या या खेळीचा संघाला काही फायदा नाही
पठाणने पुढे बोलताना, "धोनीने किमान 4 ते 5 ओव्हर फलंदाजी करायला हवी. तो सामन्यातील शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फलंदादजी करतो. मात्र दिर्घकालीन विचार केल्यास याचा सीएसकेला काही फायदा होत नाहीये," असंही 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना म्हटल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'ने दिलं आहे. धोनीने यंदाच्या पर्वात तशी समाधानकारक कामगिरी केली आहे. त्याने 7 डावांमध्ये 110 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 55 च्या सरासरीने 224.49 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यात.
नक्की वाचा >> 'मागील काही वर्षांमध्ये...'; स्ट्राइक रेटमुळे T20 वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर केएल राहुल स्पष्टच बोलला
पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी नको
"असं होऊ शकतं की चेन्नईचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरेल. त्यांना इथून त्यांचे 90 टक्के सामने जिंकणे बंधनकारक असणार आहे. उत्तम फटकेबाजी करु शकणारा आणि लय गवसलेला एक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याने वरच्या क्रमाकांवर फलंदाजी करायला हवी. त्याने मागील अनेक डावांमध्ये केलेल्या गोष्टीच तो पुन्हा पुन्हा करत राहणं फारच उपयोगाचं नाही," असंही पठाण म्हणाला.
कोणीतरी त्याला सांगितलं पाहिजे की...
"त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यामध्ये परिणामकारक खेळी मोजक्या बॉलमध्ये केली हे मान्य. मात्र जेव्हा संघाला गरज असते तेव्हा त्याच्या आधी शार्दुल ठाकूरला फलंदाजीला नाही पाठवू शकत. धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहणं खटकतं. समीर रिझवी हा 15 व्या ओव्हरला पॅड घालून तयार होता. त्यांनी यावर काम केलं पाहिजे. कोणीतरी धोनीला सांगितलं पाहिजे की, 'चल मित्रा किमान 4 ओव्हर तरी फलंदाजी कर,'" असंही पठाण म्हणाला.