Jonty Rhodes Slams Mumbaikars: सध्या इंडियन प्रिमिअर लीग 2024 ची स्पर्धा अंतीम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेनिमित्त अनेक परदेशी खेळाडू सध्या भारतात वास्तव्याला आहेत. यापैकीच एक असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईत नुकत्याच उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडसंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. जॉन्टीने गुरुवारी सोशल मीडियावरुन कोस्टल रोडवर गाड्या वेग मर्यादेचं उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे. या मार्गावर गाड्या निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगात धावत असल्याबद्दल जॉन्टीने संताप व्यक्त केला आहे.


कोस्टल रोडवर नियमांचं उल्लंघन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 मार्च रोजी 11 किलोमीटरच्या कोस्टल रोडच्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. या रस्त्यामुळे रोज वांद्रे ते दक्षिण मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर झाला आहे. मात्र या मार्गावर दररोज अनेक वाहनचालक निश्चित करुन दिलेली 80 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा मोडत असल्याचं दिसून आलं आहे. अनेक कार तर बससाठी राखीव ठेवण्यात आलेल्या मार्गिकेमधून धावताना दिसतात. या मार्गावर अनेक ठिकाणी कारचालकांनी चौथ्या मार्गिकेमधून प्रवास करु नये असे फलक लिहिलेले असतानाही नियमांचं पालन केलं जात नसल्याचं दिसून आलं आहे. याच साऱ्या प्रकारावरुन जॉन्टीने संताप व्यक्त केला आहे.


जॉन्टी संतापून काय म्हणाला?


खरं तर जॉन्टी हा स्वत: बाईकप्रेमी आहे. तो लखनऊ सुपर जायंट्सची टीम वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधून अनेकदा एकटाच आपल्या रॉयल एन्फील्डवरुन स्टेडियमपर्यंतचा प्रवास करतो. त्यानेच आपल्या एक्स हॅण्डलवरुन कोस्टल रोडवरील चालकांच्या बेशिस्त वर्तवणुकीसंदर्भात संताप व्यक्त केला आहे. "मला आठवतंय की मुंबई कोस्टल रोडचं काम सुरु झालं तेव्हा किती त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता हा मार्ग सुरु झाल्यानंतर सामान्य मुंबईकरांच्या भावना काय आहेत?" असं जॉन्टीने म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये पुढे त्याने, "मी हे टाइप करत असतानाही काही बावळट लोक हा मार्ग म्हणजे त्यांचा खासगी रेसिंग ट्रॅक असल्यासारखे गाड्या चालवत आहेत," असा खोचक टोलाही लगावला आहे. जॉन्टीने कोस्टल रोडवरुन प्रवास करतानाचा कोस्टल रोडचा फोटो पोस्ट करत ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. अर्थात मुंबईकरांच्या काळजीनेच त्याने ही चिंता बोलून दाखवली असून त्याचा टोमणा केवळ वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी असल्याचं त्याच्या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. 




...म्हणून मी दक्षिण आफ्रिकेत बाईकही चालवत नाही


एका चाहत्याने अशा बावळट लोकांकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला जॉन्टीला दिला. त्यावर जॉन्टीने, "होय, आमच्या दक्षिण आफ्रिकेमध्ये (माझ्या मायदेशात) असे वेगाने गाड्या चालवणारे बावळट लोक आहेत. ते फार वाईट असतात. त्यामुळेच मला इजा होईल या भितीने मी तिथे कधीच दुचाकी चालवत नाही," असं उत्तर दिलं.



जॉन्टीच्या मुलीचं नावही इंडियाच


जॉन्टी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. तो लखनऊच्या संघाबरोबर काम करत असून तो संघाचा फिल्डींग कोच आहे. जॉन्टीने वेळोवेळी भारताबद्दल त्याला वाटणारी आपुलकी आणि प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. जॉन्टीचं भारतावर एवढं प्रेम आहे की त्याने त्याच्या एका मुलीचं नाव 'इंडिया ऱ्होड्स' असं ठेवलं आहे. जॉन्टीच्या मुलीचा जन्म 2015 मध्ये भारतातच झाला आहे.