Ratnagiri Police Van Accidentरत्नागिरीतील बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण (Barsu Refinery Survey) आजपासून (24 एप्रिल 2023) पुन्हा सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क असताना रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. राजापूर बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीसाठीच्या माती सर्वेक्षण करण्यात येत असून काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून (24 एप्रिल 2023) ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होणार होते. त्यामुळे सर्व भागात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 22 एप्रिल ते 31 किंवा या कालावधीपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू असणार आहेत.  बारसू सडा बारसू, पन्हाळे, राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटर परिसरात हे आदेश लागू असणार आहेत. या कारणास्तव विविध भागांतून पोलीस बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले होते. राजापूर येथील बंदोबस्तासाठी पोलिसांची गाडी निघाली असता कशेळी बांध येथे पोलिसांची व्हॅन पलटी झाली. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले असून जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रिफायनरीला विरोध


रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून 45 बारसू रिफायनरी आंदोलकांवर 144 CrPC अंतर्गत अनिवार्य प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. काहींना बारसू पंचक्रोशीत तर काहींना जिल्हा नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी बारसू परिसरात 2000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहे.


ग्रामस्थांचा लॉग मार्च


रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलक एकवटले असून शेकडो आंदोलक बारसूच्या रानमळावर जमा झाले आहेत. जोपर्यंत सर्व्हे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन पुकारणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. 


ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू


बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी जमीन योग्य आहे का किंवा कशी? याकारिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राथमिक व्यवहार्यता तपासणीसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू केले होते. त्यावेळेच्या कालावधीत रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग हे प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन लोकांचे नेतृत्व करणे, दंगल करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, गुन्हेगारी धमक्या देणे, इशारे देणे, बेकायदेशीर सभेत सहभागी होणे, स्वेच्छेने दुखापत करणे, नुकसान करणे प्रतिबंधात्मक आदेश प्रशासनाचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन असे गुन्हे घडलेले आहेत, असे स्पष्टपणे नमूद करत प्रशासनाचा मागील अनुभव लक्षात घेवून हे मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहेत.