कोरोना व्हायरसचा कोकणात शिरकाव; रत्नागिरीत आढळला पहिला रुग्ण
आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४५ वर जाऊन पोहोचला आहे.
मुंबई: राज्यभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसने COVID-19 आता कोकणातही शिरकाव केला आहे. रत्नागिरी शहरातील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हा व्यक्ती दुबईहून परतला होता. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज या व्यक्तीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४५ वर जाऊन पोहोचला आहे. आज दिवसभरात मुंबईत एक, पिंपरी चिंचवडमध्ये एक व रत्नागिरीत एक असे करोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले.
कोरोनाचा असाही साईड इफेक्ट; नोकरदार महिलांचा व्याप वाढला
रत्नागिरीत कोरोनाचा रुग्ण सापडल्याने आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सध्या रायगड जिल्ह्यात विदेशातून आलेले २१४ लोक आहेत. त्यापैकी ४६ जण त्यांच्या घरातच देखरेखीखाली आहेत. तर १६८ जणांना वेगवेगळ्या ठिकाणी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
कोरोनानं जग संकटात, कोरोनाचे रुग्ण २ लाखांवर, ८ हजारांवर मृत्युमुखी
कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात आणखी ८ ठिकाणी टेस्टिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी तीन ठिकाणी नवीन लॅब उद्यापासून सुरू होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यातील NIVला भेट दिल्यानंतर ही माहिती दिली. सॅम्पल चाचणीसाठी आवश्यक असलेली कीट्स केंद्र शासनाकडून उपलब्ध होणार असून 10 लाख किट्सची ऑर्डर दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.