मुंबई : गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि कोकण विभागात चांगला पाऊस पडला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तर अधूनमधून सरी कोसळत आहेत. दक्षिण कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर पुढील २४ ते ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हा पाऊस प्रामुख्याने कोकण भागात पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत आज दुपारी समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत चार दिवसांपूर्वी जोरदार पावसाने धुमाकुळ घातला होता. दोन दिवस अधूनमधून पाऊस कोसळत आहे. सोमवारी मुंबई शहर व उपनगरांतील काही भागांमध्ये मुसळधार झाल्याने ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचले होते. त्यामुळे याचा परिणाम रस्ता वाहतुकीवर झाला होता. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस  झाला. त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचा धोका टळला.



गेल्या २४ तासांत  महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह चांगला पाऊस झाला. दरम्यान, पुढील २४ ते ४८ तासात पुन्हा कोकण किणारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.