राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण; रायगडावर पार पडला सोहळा
Sharad Pawar Group : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर त्याचे आज रायगडावर अनावरण झालं आहे. यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे रायगडावर पोहोचले आहेत.
Sharad Pawar Group : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’हे नाव ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह बहाल केले. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह वापरता येणार आहे. त्यामुळे आता हे चिन्ह जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी शरद पवार गटाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येत आहे. त्यासाठी शरद पवार यांच्यासह सर्वच नेते रायगडावर उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले आहे. याचे अनावरण स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात होणार आहे. शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे गडावर पोहचले आहेत.
दरम्यान, शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स अकाऊंवरुन या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. या कार्यक्रमाचा एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. "आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया! ‘शरद पवार साहेबांच्या साथीने विकासाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.