लवकर दौरे करुन नारळाची झाडं उभी केलीत, पवारांचा भाजप नेत्यांना सणसणीत टोला
आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व पवारांना उशिरा जाग आली.
मुंबई: निसर्ग चक्रीवादळानंतर भाजपने तातडीने कोकणात मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेची शरद पवार यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सव्याज परतफेड केली. शरद पवार यांनी म्हटले की, भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं उभी केली. मला आनंद आहे, त्यांचं अभिनंदन, असा उपरोधिक टोला पवारांनी हाणला.
कोकणाला केंद्र आणि राज्य सरकारने धोरण ठरवून मदत केली पाहिजे- शरद पवार
गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. यानंतर आता शरद पवार सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या मुद्द्यावरून पाटील यांनी सोमवारी पवारांसह मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली होती.
'आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदुषक हवाय'; पवारांचा सॉल्लिड प्रतिटोला
कोकणाला वादळाचा तडाखा बसताच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तातडीने तिथे पोहोचले. भाजपचे अनेक स्थानिक आमदार तेथे गेले. त्यांनी मदत केली. भाजपने पत्रे, ताडपत्रे व प्लास्टिक असा सोळा ट्रक माल रवाना केला. आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व पवारांना उशिरा जाग आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.