एका दिवसासाठी भाजपचे नेते होऊन बघा; चंद्रकांत पाटलांची पत्रकारांना ऑफर
सध्या भाजप सरकारला अनेक आक्षेपांना तोंड द्यावे लागत आहे.
सावंतवाडी: एका दिवसासाठी भाजपचे नेते होऊन बघा, म्हणजे आम्हाला कराव्या लागणाऱ्या कसरतीची कल्पना तुम्हाला येईल, असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते शनिवारी सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते.
इंधन दरवाढीची समस्या, भाजप मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि अन्य मुद्द्यांवरून सध्या भाजप सरकारला अनेक आक्षेपांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना ही ऑफर दिली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, युतीमधील मित्रपक्षांसोबत कसरत करत चार वर्षे सत्तेत आहोत. पुढील वर्षही पूर्ण करू. तुम्ही एक दिवसासाठी भाजपाचे नेते व्हा, मग शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, राजू शेट्टी यांचा समतोल साधत कसे पुढे जावे लागते हे तुम्हाला कळेल, असे पाटील यांनी सांगितले.