तुळस ही औषधी गुणांनी संपूर्ण असून आयुर्वेदात तिला अनन्य साधारण महत्व आहे. व्हायरल इंफेक्शन ते श्वसनाचे विकार इत्यादी अनेक आजारांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीचं पाणी उपयोगी ठरू शकते. केवळ तुळशीची पानंच नाही तर वनस्पतीचा प्रत्येक भाग उदा. देठ, बिया, पानं फुल इत्यादी सर्व भाग हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. जर तुम्हाला खोकला होत असेल तर तुळशीची दोन चार पान तोंडात टाकून सेवन केल्यास आराम मिळू शकतो. तुळशीच्या बिया पाण्यात उकळून प्यायल्याने घशाला आराम मिळतो. रात्री पाण्यात काही पाने टाकून उकळल्यास आणि तेच पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अनेक लाभ मिळू शकतात. तुम्ही तुळशीची पान ही सॅलडवर टाकून सुद्धा खाऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी प्यायल्यास आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात. 


पावसाळी आजारांपासून आराम : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया तसेच ताप, सर्दी खोकला इत्यादी आजारांचा धोका वाढतो. तेव्हा जर तुम्ही तुळशीच्या पानांना चहा किंवा पाण्यात उकळून प्याल तर ताप बरा होऊ शकतो. तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून खाल्ल्याने खोकल्याची समस्या दूर होऊ शकते.  तुम्ही तुळशीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या करू शकता, यामुळे घशात खवखव होण्यापासून आराम मिळतो. 


किडनीच्या आरोग्यासाठी गुणकारी : 


तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यामुळे किडनी स्टोन सुद्धा बरा होतो. किडनी स्टोन असलेल्या लोकांनी दररोज तुळशीच्या पानांचे पाणी आणि त्या सोबत मध मिक्स करून प्यायल्यास मूत्रमार्गातील खडे काढून टाकण्यास मदत होते. मात्र यापूर्वी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 


ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते : 


ग्लोबल साइंस रिसर्च जर्नलमध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्टनुसार, रिकाम्या पोटी दोन ते तीन तुळशीची पाने आणि एक चमचा तुळशीचा रस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत मिळते.  डायबेटिज रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. मात्र एका अभ्यासानुसार जर उपवासाच्या दिवशी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास रक्तातील साखर खूप कमी होऊ शकते. 


त्वचेच्या संसर्गापासून आराम : 


तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. या गुणांमुळे त्वचेच्या संसर्गापासून आराम मिळतो. तुळशीचा रस वापरल्याने बुरशीजन्य संसर्ग आणि इतर प्रकारच्या त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यात मदत होते.


हेही वाचा : डायबेटिज ते डेंग्यू; 10 आजारांवर रामबाण ठरते एक वनस्पती, तज्ज्ञांनी सांगितलं कसं करायचं सेवन


 


ताण कमी होतो : 


तुळशीच्या सेवनाने ताणतणाव कमी होतो. नियमित तुळशीच्या पानांचे किंवा पाण्याचे सेवन केल्यास बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची शरीराची क्षमता वाढते. मानसिक शांतता मिळण्यास तुळशीचे सेवन उपयोगी ठरते.


हृदयाचे आरोग्य : 


तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी आणि युजेनॉल सारखी अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून हृदयाचे संरक्षण करतात. तुळशीच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. 


ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते : 


तुळस ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. तुळसमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए असते. तज्ञ ब्लड प्रेशरचा रुग्णांना चार ते सहा आठवडे नियमित रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देतात.   


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)