फाटकं लुगडं... शाहू महाराजांनी दिलेला शेला; बाबासाहेबांच्या कार्यासमोर दुर्लक्षित राहिलेल्या रमाईंचा `तो` किस्सा
Ramabai Amebedkar Story : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल रोजी जयंती. भिम जंयतीनिमित्त आपण बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या रमाबाई आंबेडकरांच्या जीवनातील खास प्रसंग पाहणार आहोत.
Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024: डॉ. भिमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. बाबासाहेबांची आठवण येताच भारताच्या संविधानाची आठवण होते. बाबासाहेबांनी जातीभेद विरोधात अनेकदा लढा. अस्पृशांसोबतच कामगार वर्गासाठीही बाबासाहेबांनी कार्य केले. पण या कार्यात ते एकटे नव्हते तर त्यांच्या धर्मपत्नी रमाबाई यांची खंबीर साथ होती.
रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. अवघ्या वयाच्या 9 व्या वर्षी रमाबाई यांचं भिमराव आंबेडकर यांच्यासोबत लग्न झालं. तेव्हा बाबासाहेब 14 वर्षांचे होते. भीमराव आपल्या पत्नीला प्रेमाने 'रामू' अशी हाक मारत. त्यागवती रमाई यांच्या जीवनातील आपण एक किस्सा जाणून घेणार आहोत. ज्यामुळे रमाई यांचं वेगळेपण अधोरेखीत होतं. हा किस्सा लेखक योगीराज बागूल यांनी लिहिलेल्या 'प्रिय रामू' या पुस्तकात मांडला आहे.
त्यांची शरीरं दोन होती, जीव मात्र एकच होता..
14 एप्रिल हा बाबासाहेबांचा वाढदिवस. त्या दिवसाच्या 11 दिवस अगोदर म्हणजे 3 एप्रिल 1923 रोजी बाबासाहेबांची बोट लंडनवरुन मुंबईच्या बंदरावर येणार होती. बाबासाहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होती. याचवेळी बाळराम यांनी रमाबाईस पाचपन्नास रुपये दिले व त्यांच्यासाठी आणि मुलासाठी कपडे खरेदी करण्यास सांगितले. कारण बाबासाहेब येतील तेव्हा रमाई आणि मुलगा यशवंत चांगल्या कपड्यात दिसायला हव्यात म्हणून.
पण स्वतःवर पैसे खर्च करतील त्या रमाई कशा? साहेबांना आता गादीवर झोपायची सवय लागली असेल म्हणून त्यांनी त्या पैशातून एक गादी, दोन उश्या आणि बाबासाहेबांसाी जेवणाकरिता एक पाट, धोतर आणि सदरा खरेदी केला. अखेर साहेब येण्याचा दिवस उजाडला. रमाईंनी साहेबांना भेटण्यासाठी बंदरात जाण्याचं ठरवलं पण नेसण्यासाठी नीटसं लुगडं नव्हतं. फाटकं जुनं झालेलं लुगडं नेसूण जाणं म्हणजे घराची आणि साहेबांची अब्रू बाहेर दाखवणं असं होईल.
रमाबाईंना यावेळी नणंद मंजुळा यांनी स्वतःचं लुगडं देऊ केलं. पण मानी स्वभावाच्या रमाईंनी ते घेतलं नाही. मग त्यांना आठवलं की, एका पेटीमध्ये साहेबांना माणगाव परिषदेच्या सत्काराच्या वेळी शाहू महाराजांनी शेला भेट म्हणून दिला होता. तो भरजरी शेला रमाबाईंनी कोकणी पद्धतीने नेसला.
तयारी करुन रमाई साहेबांच्या स्वागताला गेल्या. कधी एकदा साहेबांना पाहते, असं त्यांना झालं होतं. अखेर बाबासाहेबांची आणि रमाईंची नजरा नजर झाली. यावेळी शाहू महाराजांनी दिलेला शेला नेसलेली रमाई कुटुंबियांसह साहेबांच्या समोर आल्या. आणि साहेब रमाईंकडे फक्त पाहतंच राहिले. साहेब आणि रमाई यांची शरीरं दोन होती, जीव मात्र एकच होता...