जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने भारताव्यतिरिक्त परदेशातील चहाच्या संस्कृती बद्दल जाणून घेऊयात. चहा पिण्यासाठी कोणत्याही वेळेचं बंधन नाही. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते ऑफिसच्या कामातून थोडासा ब्रेक काढण्याचं निमित्त म्हणजे चहा. कश्मिरी कहावा, दार्जिलिंग चहा यासारखे बरेच चहाचे प्रकार भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र भारतीय चहाप्रमाणेच तुम्हाला परदेशतील चहाच्या संस्कृतीबद्दल माहितेय का ? 


चहाचा मूळ इतिहास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर चहाची संस्कृती ही चीनमधून जगभरात पोहोचली. उत्साहवर्धक असलेल्या या पेयाचा मूळ उगम हा चीन देशातला असल्याचं म्हटलं जातं. चीनचा राजा शेंग नंग हा युद्घावर असाताना त्याला त्याच्या एका शिपायाने गरम पाणी उकळून दिलं होतं. त्या पाण्यात वाऱ्यामुळे जंगलातील काही पानं मिसळली गेलीय त्यानंत त्या पाण्याचा रंग बदलला आणि सुगंध येऊ लागला. त्या गरम पाण्याच्या वासाने भारावून गेलेल्या राजाने जंगलातील सुंगंधी आणि औषधी वनस्पती शोधण्यास सुरुवात केली. अश्या पद्धतीने जगात चहाचा पहिला शोध चीनमध्ये लागल्याचं म्हटलं जातं. मूळ चीनी असला तरी हळूहळू या चहाचा प्रसार जगभरात होत गेला.  


चीनी चहा 



चीनमधील चहाची पद्घत ही भारतीय चहा प्रकाराहून पुर्णपणे वेगळी आहे. चीनी चहा सहा वेगवेगळ्या प्रकारांत पहायला मिळतो.  पांढरा , हिरवा , पिवळा , उलॉन्ग , काळा आणि पोस्ट-फरमेंटेड अशा सहा वेगवेगळ्या प्रकारांत चीनी चहा आढळतो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये वजन कमी करण्यासाठी चीनी संस्कृतीतील ग्रीन टीचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. 


जपानी चहा 



जपानमधील चहा  संस्कृती ही चीनपेक्षा वेगळी आहे. ‘माचा चहा' हा जपानी पारंपारिक चहाचा प्रकार आहे. माचा चहा दिसायला ग्रीन टी सारखा असला तरी दोन्हीमध्ये खूप फरक असल्याचं म्हटलं जातं. माचा चहा हा हिरव्या रंगाच्या औषधी वनस्पतींच्या पानांपासून तयार करण्यात येत असल्यानं याला जागतिक बाजारपेठात मोठी मागणी आहे. या चहामुळे हृदयविकाराचा त्रास कमी होतो असं म्हणतात. जपानमध्ये खास पारंपारिक सणाला माचा चहाला विशेष महत्त्व दिलं जातं.   


ब्रिटन चहा 



राजेशाही थाट असलेल्या या देशाची चहासंस्कृतीसुद्धा तशीच आहे. भारतीयांना चहाची सवय ही ब्रिटीशांनी लावली. व्यापार करायला आलेल्या ब्रिटीशांनी भारतात चहा संस्कृती आणली. यॉर्कशायर टी हा चहाप्रकार ब्रिटनमध्ये प्रसिद्ध आहे.दीडशे वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटीशांनी काही चांगल्या सुविधा भारतात आणल्या त्या पैकी एक म्हणजे चहा संस्कृती. आज भारतातील आसाम, दार्जिलींग आणि कश्मिरी कहावा या चहा प्रकारांना जगभरात मोठी मागणी आहे. 


थायलंड चहा 



लेमन टी, आईस टी यांसारखे चहाचे प्रकार आता दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. मात्र तुम्हाला माहितेय का ? "चा-येन" नावाचा चहा प्रकार हा थायलंडमधील आहे.या चहामध्ये बर्फ टाकला जातो. तसंच याला सुगंध येण्यासाठी बडीशेप, नारिंगी ब्लॉसम इत्यादी विविध मसाल्यांचा वापर करण्यात येतो.त्याशिवाय यात सुगंधी फुलांचा ही वापर केला जातो. चहा संस्कृती ही जगभरात हळूहळू पसरत गेली. मूळ चहा संस्कृती काही ना काही बदल करत प्रत्येक देशाची स्वत:ची चहा संस्कृती उदयास आली.