नवरा-बायकोचं नातं कसं असावं? `त्या कठीण काळात...` भावनिक होत जया बच्चन झाल्या व्यक्त
Relationship Tips From Jaya Bachchan And Amitabh Bachchan : जया बच्चन यांनी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या `त्या` कठिण काळाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. नातं नव्याच्या पॉडकास्टवर अमिताभ बच्चन यांच्या कठिण काळात कसा सपोर्ट केला, याबद्दल जया बच्चन बोलल्या आहेत.
Jaya Bachchan Amitabh Bachchan Bond : जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नातं हे प्रत्येकालाच हेवा वाटेल असं आहे. एकमेकांना आतापर्यंत दिलेली साथ ही खरंच कौतुकास्पद आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात अनेकदा चढ-उतार आले. मात्र यावेळी या दोघांनी एकमेकांना शांतपणे दिलेली साथ खरंच कौतुकास्पद आहे. आजच बिगबी यांच्यावर अँजियोप्लास्टी सर्जरी झाली. त्यांच्या आरोग्याबाबतच्या समस्या थांबायचं नाव घेत नाहीत. मात्र याकाळात जया बच्चन यांची साथ कायमच महत्त्वाची ठरली आहे.
जया बच्चन यांनी नातं नव्याच्या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच 'तो' काळ आणि तेव्हाच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या करिअरशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. एवढंच नव्हे तर पती अमिताभ बच्चन यांच्या कठीण प्रसंगाबद्दलही सांगितले आणि आपण त्यांच्या मागे शांतपणे उभी असल्याचे सांगितले. 90 च्या दशकात अमिताभ अतिशय वाईट टप्प्यातून जात होते. त्यावेळी जया यांनी त्यांना कशी साथ दिली आणि ती परिस्थिती कशी हाताळली याबद्दल मनमोकळेपणाने बोलल्या आहेत.
नव्या नवेलीच्या पॉडकास्ट शो What The Hell Navya च्या दुसऱ्या सीझनच्या नवीन एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जया यांनी सांगितले की, जास्त हस्तक्षेप करण्याऐवजी पत्नीने पतीच्या खडतर काळात त्याच्यामागे शांतपणे उभे राहणे गरजेचे आहे.
खंबीर साथ
अमिताभ बच्चन एकेकाळी बोफोर्स घोटाळ्यात अडकले होते. त्यांना माध्यमांनीही बंदी घातली होती. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षे फ्लॉप चित्रपट दिले. अमिताभ बच्चन हे एबी कॉर्पचे निर्मातेही बनले. पण ही खेळीही अयशस्वी ठरली. मग एक काळ असा आला की, अमिताभ जवळजवळ दिवाळखोरीत गेले. जया यांनी पॉडकास्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्या या वाईट टप्प्याबद्दल सांगितले. मात्र या काळात अमिताभ बच्चन यांना जया बच्चन यांनी दिलेली साथ अतिशय महत्त्वाची ठरली. कारण परिस्थिती कितीही खडतर असली तरीही आपल्यासोबत जोडीदार असेल तर त्या कठिण परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळतं.
शांत राहा
जया बच्चन म्हणाल्या, 'आम्ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अपयशांना सामोरे गेलो. मात्र आम्ही त्याचा एकत्रित सामना केला. मी बरोबर किंवा चुकीची गोष्ट केली हे मला माहित नाही, परंतु फक्त तिथे असणे देखील चांगले आहे परंतु जेव्हा एखादा माणूस अशा परिस्थितीतून जात असेल तेव्हा शांत रहा. कुरघोडी करण्याऐवजी चिडचिड करण्याऐवजी शांतपणे उभे राहा. जर त्यांना तुमची मदत हवी असेल तर ते त्यासाठी तत्पर राहा. पण ती मदत त्यांना स्वतःहून मागू द्या. कारण न मागता मदत करायला गेल्यावर राग येण्याची शक्यता अधिक असते. कदाचित गप्प बसून तिथेच उभे राहून शांतपणे सांगणे की मी तुझ्या पाठीशी आहे, हे अधिक बळ देणारं असतं. जया बच्चन आपल्या या कृतीतून नवरा-बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांना कशापद्धतीने साथ द्यावी हे सांगितलं आहे.