Karva Chauth: करवा चौथला चाळणीतून पतीचा चेहरा पाहण्याची ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की चाळणीला हजारो छिद्रे असतात. ज्यामुळे त्यातून चंद्र पाहताना त्या छिद्रांच्या संख्येइतक्या चंद्राच्याही प्रतिमा दिसतात. चंद्रानंतर पतीचा चेहरा चाळणीत पाहिल्याने त्याचे वयही त्या छिद्रांच्या संख्येइकते वाढते असे मानले जाते. त्यामुळे करवा चौथचे व्रत केल्यानंतर चंद्र आणि पतीचा चेहरा पाहण्यासाठी चाळणी वापरली जाते. त्याशिवाय करवा चौथ व्रत पूर्ण झाले असे मानले जात नाही. 


पुराणातही आढळतो करवा चौथचा उल्लेख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


करवा चौथच्या व्रताचा उल्लेख पुराणात करक चतुर्थी या नावाने आढळतो. करवा चतुर्थीच्या दिवशी महिला अन्नपाणी न घेता आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत हा उपवास करतात. पुराणात अशी कथा आहे की, जेव्हा प्रजापती दक्षने चंद्राला शाप दिला की तु क्षीण होशील. जो कोणी तुझे दर्शन घेईल त्याच्यावर तुझा कलंक येईल आणि तो व्यक्ती बदनाम होईल. तेव्हा चंद्र रडत भगवान शंकरांकडे गेला आणि म्हणाला की या श्रापामुळे चतुर्थीच्या दिवशी मला कोणीच बघणार नाही. तेव्हा भगवान शंकर म्हणाले की सगळ्या चतुर्थी सोडून कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला जो कोणी तुझे दर्शन घेईल, त्याच्या आयुष्यातील सर्व दोष आणि कष्ट नष्ट होतील. 


करवा चौथची पौराणिक कथा


 


एका पौराणिक आख्यायिकेनुसार, करवा नावाची एक महिला होती. एके दिवशी तिचा नवरा नदीत आंघोळीला गेला असताना एका मगरीने त्याचा पाय पकडला. त्याने पत्नी करवाला मदतीसाठी बोलावले. तेव्हा करवाने यमराजाची प्रार्थना केली. यमराजाने करवाला विचारले की देवी, तू इथे काय करतेस आणि तुला काय हवे आहे. करवाने यमराजाला सांगितले की या मगरीने माझ्या पतीला पकडले आहे. त्याला तुम्ही आपल्या सामर्थ्याने मृत्युदंड द्या. यमराज म्हणाले की या मगरीला अजून खूप आयुष्य बाकी आहे, त्यामुळे मी तिला मृत्युदंड देऊ शकत नाही.


यमराजाच्या बोलण्यावर करवाने सांगितले की जर तम्ही मगरीला मारून माझ्या पतीला दीर्घायुष्याचे वरदान दिले नाहीत तर मी तपश्चर्या करेन. करवामातेचे शब्द ऐकून यमराजाच्या जवळ उभा असलेला चित्रगुप्त काळजीत पडला कारण करवाच्या पवित्रतेमुळे तो तिला शापही देऊ शकत नव्हता किंवा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता. त्यानंतर चित्रगुप्ताने मगरला यमलोकात पाठवले आणि करवाच्या पतीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला.


चित्रगुप्त म्हणाले, तू तुझ्या तपश्चर्येने तुझ्या पतीचे प्राण वाचवलेस त्यामुळे मी आनंदी आहे. मी वरदान देतो की या दिवशी पूर्ण भक्तिभावाने व्रत करणार्‍या कोणत्याही स्त्रीच्या सौभाग्याचे मी रक्षण करीन. त्या दिवशी कार्तिक महिन्याची चतुर्थी तिथी असल्याने करवा आणि चौथ एकत्र करून करवा चौथ असे नाव पडले. माता करवा ही पहिली महिला आहे जिने आपल्या पतीच्या रक्षणासाठी करवा चौथ व्रत सुरू केले. यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून द्रौपदीनेही हे व्रत पाळले.


याशिवाय करवा चौथच्या वेळी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. या शुभ दिवशी भक्त माता पार्वतीसोबत भगवान कार्तिकेयचीही पूजा करतात.