Tips For Healthy Pregnancy: गर्भधारणा झाल्यानंतर माता आणि बाळाची दोघांचीही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. गरोदर महिलांच्या शरीराला मिळणारी सर्व पोषण तत्त्वं त्यांच्यावाटे बाळापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळं कायमच गरोदर महिलांना संतुलित आणि आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. याच आहारातील एक अतीव महत्त्वाचा घटक म्हणजे, डाळी. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या डाळींचा आहारात समावेश असल्यानं त्याचा थेट फायदा गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला होतो. जाणून घ्या नेमक्या कोणत्या डाळी या महिलांसाठी फायद्याच्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसूर डाळ 
मसूर डाळीमध्ये लोह आणि प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतात. गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीराला लोहाची सर्वाधिक आवश्यकता असते. यामुळं लाल रक्तपेशींची संख्या नियंत्रणात राहून अॅनिमिया होण्याचा धोका टळतो. 


मूग डाळ 
मूगडाळ पचण्यास हलकी असते. या डाळीच्या सेवनामुळं सकाळच्या वेळी वाटणारा अशक्तपणाकमी होतो. शिवाय यामध्ये असणाऱ्या फोलिक अॅसिडमुळं बाळाचा मेंदू आणि मणका अधिक चांगल्या पद्धतीनं विकसित होतो. 


चना डाळ 
चणा डाळीमध्ये तंतूमय घटक अधिकस असतात. यामुळं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. शिवाय या डाळीच्या सेवनानं शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो. 


हेसुद्धा वाचा : गुगलच्या सीईओंना भारतीय पदार्थांची भुरळ, म्हणाले मुंबईत आल्यावर....


 


उडीदाची डाळ 
उडीद डाळ कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत असून, त्यामुळं हाडांना बळकटी मिळते. शिवाय या डाळीत असणारी प्रथिनं आणि फोलिक अॅसिड गर्भवती महिलांसाठी फायद्याचं ठरतं. 


डाळींचा आहारात समावेश करण्याची पद्धत... 


डाळी विविध भाज्यांसमवेत शिजवून त्या आणखी चवदार करता येतात. डाळ शिजवण्यापूर्वी ती किमान 6 ते 7 तास पाण्यात भिजवून ठेवावी. यामुळं गॅसची समस्या उदभवत नाही. डाळीचं नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जात असला तरीही त्याचं प्रमाण अधिक नसावं. कारण, त्यामुळं गॅसची समस्या बळावते. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)