Diwali 2023 : वर्षभरात अनेक सणवार येतात, पण दिवाळीची बातच न्यारी असते. कारण, ही दिवाळी आनंदाची बरसात करत येते आणि आयुष्यात काही सुरेख क्षणांची उधळण करून जाते. अशा या दिवाळी सणाच्या निमित्तानं घरोघरी फराळ बनवला जातो. लाडू, करंज्या, शंकरपाळी, चकली, अनारसे, चिवडा... अशा एक ना अनेक पदार्थांनी ताट भरून जातं. मग काय? दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळ, दुपार, चहा नाश्त्याला, गोडाचं खायला हा फराळच पुढे केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाश्त्याला शंकरपाळी, जेवणावर पापडाऐवजी चकली किंवा शेव, रात्री जेवणानंतर गोड काही खायचं झाल्यास एखादा लाडू घरातील महिला वर्ग आपल्यापुढे करते. पण, सतत फराळ, प्रत्येकाच्याच घरात फराळ पाहून या फराळावरूनही मन उडतं. सरतेशेवटी या फराळाकडे अनेकजण पाठ फिरवतात आणि तो डब्यातच राहतो. 


यंदाच्या वर्षी तुमच्याही सोबत असंच झालंय का? किंवा असं होऊ नये ही तुमची इच्छा असेल तर या फराळाचा व्यवस्थित वापर करा, असा की तो इतरांच्या मुखीसुद्धा लागेल आणि हा फराळ आहे हे लक्षातही येणार नाही. 


फराळापासूनच बनवा नवे पदार्थ 


तुम्हाला माहितीये का, फराळातील काही पदार्थ किंवा फराळासाठीची पीठं तुम्ही पुन्हा वापरात आणूच शकता. कसं के पाहा.... 


रव्याचे लाडू- रव्याचा लाडू बनवताना सहसा त्यामध्ये तूप, साखर, रवा, वेलचीपूड असंच साहित्य असतं. काही मंडळी यामध्ये सुकामेवा वापरतात. रव्याचे लाडू उरल्यास तुम्ही त्याचा शिरा बनवू शकता किंवा मग रव्याची खीर. रव्याचा लाडू शिऱ्याचं प्रीमीक्स म्हणून एक उत्तम पर्याय. खीर बनवण्यासाठी हा लाडू दुधात फोडा आणि रवा शिजवून घ्या. 


बेसन लाडू- बेसनाचे लाडू उरल्यास त्यामध्ये मुगाचं पीठ, गव्हाचं पीठ भाजून मिसळा आणि याच्या वड्या तयार करा. 


शंकरपाळी- शंकरपाळी उरली असल्यास मिक्सरमध्ये ती वाटून घ्या, बारीक मिश्रण झालेल्या या शंकरपाळीत तूप मिसळून तुम्ही त्याची बिस्कीटं बनवू शकता. अगदीच हटके काही करायचं असल्यास या मिश्रणात दूध मिसळून एक बेस तयार करून तुम्ही चीजकेक बनवू शकता. (याच्या रेसिपी ऑनलाईन मिळतील)


हेसुद्धा पाहा : बापरे 'या' देशात होतात सर्वाधिक घटस्फोट; पाहा भारताचा कितवा क्रमांक.... 


चकलीची भाजणी- चकलीची भाजणी उरली असल्यास या भाजणीचा वापर तुम्ही थालीपीठ बनवण्यासाठी करु शकता. थालीपीठ बनवताना त्यात भाज्यांचा वापर पदार्थाची चव आणखी वाढवून जाईल. 


पोह्यांचा चिवडा- पोह्यांचा चिवडा तुम्ही कांदे पोह्यांचं प्रिमिक्स म्हणून वापरू शकता. पोह्यांमध्ये फोडणीला लसूण वापरला नसल्यास याच पोह्यांवर गरम पाणी शिंपडल्यास काही वेळ वाफ काढली तर ते कांदेपोह्यांप्रमाणं फुलतील. 


थोडक्यात फराळ उरला असला तरीही तो तुम्ही किती कल्पकतेनं पुन्हा वापर करून संपवता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं. एकदा प्रयोग करून तर पाहा.