मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : सर्वसाधारणपणे बूट १० नंबरचा असतो. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात चक्क २० नंबरचा म्हणजेच दीड फूट लांबीचा बूट सापडला आहे. हा बूट कोणाचा असेल याबाबत गूढ निर्माण झालं आहे. सर्वसाधारणपणे बुटाच्या दुप्पट आकाराचा हा बूट कोण वापरत असावा. याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी दीड फूट लांबीचा बूट कोणी पाहिला नसेल. २० नंबरचा हा बूट कोण वापरतो याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. तुम्ही दुकानात चपला किंवा बूट खरेदीला जाता तेव्हा तुम्हाला फार तर पाच ते नऊ नंबरचे बूट किंवा चप्पल लागतात. फारच मोठे पाय असतील तर १० किंवा अकरा नंबरची चप्पल किंवा बूट लागतो. पण तुम्ही कधी २० नंबरचा बूट पाहिला नसेल. २० नंबरचा बूट बुलढाणा जिल्ह्यातल्या बोथा काजी गावात सापडला आहे. 


सुरेश गावंडे यांच्या शेतातल्या विहिरीत दीड फूट लांबीचा बूट सापडलाय. विहीरीच्या गाळासोबत दीड फूट लांबीची बुटाची जोडी विहिरीबाहेर आली. एवढे मोठे बूट पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले. या दीड फुटाच्या बुटासमोर सामान्य माणसाचा बूट अगदीच छोटा दिसतोय. या बुटाबाबत आम्ही बुलढाण्यातल्या विक्रेत्यांना विचारणा केली. त्यांनी गेल्या चाळीस वर्षात एवढी मोठ्या मापाची बुटं विकली नसल्याचं सांगितलं.


दीड फूट लांबीचा बूट कुणाचा असेल? हा बूट कोण वापरत असावं? तो माणूस किती उंचीचा असावा? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत.