मुंबई / जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख १२ हजार ४७७ कुटुंबांतील ३४ लाख ८१ हजार १६९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १ लाख ९ हजार ५१९ जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान संपूर्ण राज्यात १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जळगाव महापालिका क्षेत्रात महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तर जिल्ह्यातील १८ नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी आणि ग्रामीण भागात  अभियान राबिवण्यात येत आहे. 


माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे २ हजार ५३३ पथके, नगरपालिका क्षेत्रांमध्ये २८० तर महापालिका क्षेत्रात १३४  असे एकूण २९७४ पथके जिल्हाभरात कार्यरत आहेत.  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ६७३ कुटुंबांना भेट दिली. या कुटुंबातील २७ लाख ७ हजार ३११ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. 


या तपासणीत आरोग्य पथकांना ७८  हजार २१०  जुन्या विकारांचे, सारीचे ५५५ तर सर्दी, खोकला, ताप (ILI) चे ६ हजार ३३२ रुग्ण आढळून आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून ९ हजार ३३९ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी ८८७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.


१८ नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील ६८ हजार ८८८ कुटुंबातील ४ लाख ६८ हजार ३६ नागरीकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० हजार ५२९ जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर १६८३ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले यापैकी ३३९ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.


जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ८९ हजार ९१६ कुटुंबातील ३ लाख ५ हजार ८२२  नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १० हजार ७८० जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सारीचे १८, सर्दी, खोकला, तापाचे १७९ रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १६६ व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तर ८६ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहे.