जालन्यात वीज पडून दहा शेळ्या दगावल्या
शेतात चरायला गेलेला शेळ्यांचा कळप एका झाडाखाली थांबला होता.
नितेश महाजन, झी २४ तास, जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील साळेगाव येथे वीज पडून दहा शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे. जालना परिसरात शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचाही प्रचंड कडकडाट सुरु होता. तेव्हा साळेगाव परिसरात शेतात चरायला गेलेला शेळ्यांचा कळप एका झाडाखाली थांबला असताना त्यांच्यावर वीज कोसळली. यामध्ये दहा शेळ्यांचा मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार आणि रिमझिम असा वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळत आहे. जालना शहरासह जाफ्राबाद, भोकरदन आणि बदनापूर तालुक्यात देखील चांगला पाऊस झाला आहे. आज सकाळी या भागात पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी आधार दिलाय. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद तालुक्यातील भागात काल संध्याकाळच्या दरम्यान देखील पाऊस झाला. संध्याकाळी सातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तर आज सकाळपासूनच जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार होते. अखेर सकाळपासून जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.