विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीड (Beed Accident) जिल्ह्यात अपघातामुळे 10 जणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या दोन अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय. बीड- अहमदनगर महामार्गवर (Ahmednagar) ट्रकला ॲम्बुलन्सने पाठीमागून धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात दौलावडगाव जवळ रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला. अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर हॉस्पिटल, यांचा अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत.


तर दुसरी घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली आहे. दुसऱ्या अपघातात अहमदनगर -बीड राष्ट्रीय महामार्गावर आष्टा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी सागर ट्रॅव्हल उलटून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमी प्रवाशांना नगर आणि बीड येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं  आहे.  सागर ट्रॅव्हल ही बस  मुंबई वरून बीडकडे निघाली होती.  मात्र बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील आष्टा फाटाजवळ आज सकाळी सहाच्या दरम्यान ती उलटली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर आष्टी,जामखेड येथे उपचार सुरू आहेत.