रायगडमधील चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटी रुपयांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माहिती
अलिबाग, रायगड : निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. ही सुरुवात आहे. त्याला पॅकेज म्हणू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा केला. निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झाले आहे. घरे पडली आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत. होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी थळ येथे जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख हेदेखिल त्यांच्याबरोबर होते. पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना रायगडमध्ये वादळाने झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.
घरांची पडझड झाली आहे, त्यांना तातडीने मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मच्छिमारांचे देखिल या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही सरकार मदत करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सध्या तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये देण्यात येतील. अर्थाच ही सुरुवात आहे. याला पॅकेज म्हणू नका. आम्ही थेट मदतीला सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
आपत्तीकाळात जीवितहानी होऊ नये म्हणून प्रयत्न केला. तरीही प्राणहानी झाली. हे नुकसान भरून येणार नाही. शासनाने मदत दिली, पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
संकट सर्वांसाठी असते. पक्षभेद विसरून आपण एकत्र काम करू आणि रायगड जिल्हा पुन्हा उभा करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी दुपारी रोरो बोटीने मांडवा-अलिबागला दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. अलिबाग येथे आढावा बैठकही घेतली आणि त्यानंतर मदतीची घोषणा केली.