नांदेड: आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांना चांगलाच संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. कारण, याठिकाणी त्यांच्याविरोधात १२० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे भोकरमधून अशोक चव्हाण यांनी उमेदरवारी दाखल केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात या १२० जणांनी उमेदवारी दाखल केली होती. या सर्वांनी मिळून १३४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे यापैकी कितीजण माघार घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, यापैकी कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्यास निवडणूक आयोगाला प्रत्येक मतदान कक्षात तब्बल ९ ईव्हीएम यंत्रांची सोय करावी लागेल. 


भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भोकरमधून अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता चव्हाण या निवडून आल्या होत्या. त्यामुळे यंदाही अमित यांनाच भोकरमधून उमेदवारी मिळावी, यासाठी अशोक चव्हाण प्रयत्नशील होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांनाच रिंगणात उतरण्याचे आदेश दिले. 


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण नांदेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. २०१४ मध्ये मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी नांदेडचा गड राखला होता. त्यामुळे २०१९ मध्येही ते याची पुनरावृत्ती करतील, अशी अपेक्षा पक्षाला होती. मात्र, वंचित फॅक्टरमुळे अशोक चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला होता. 


भाजपचे प्रतापराव चिखलीकर नांदेड मतदारसंघात ५० हजार मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे अशोक चव्हाण विधानसभेची लढवण्यास फार इच्छूक नव्हते. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागले. याठिकाणी भाजपकडून नांदेडमधील ताकदवान नेते बापुसाहेब गोर्ठेकर निवडणूक लढवणार आहेत.