प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची धूम सुरु आहे. रायगड जिल्हायाच्या पेण तालुक्यातील मुंढाणी ग्रामपंचायतीमधील बाराशेहून अधिक मतदारांची नावं निवडणुकीच्या आधी अचानक मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे ग्रामस्थ‍ हैराण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतच संशय व्यक्त होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेण तालुक्याबतील तरशेत मुंढाणी आणि जांभुळटेप अशी ३ गावं मिळून मुंढाणी ग्रामपंचायत आहे. १९८९  मध्ये आलेल्या महापुरात ही तिन्ही गावं उध्वस्त  झाली आणि ग्रामस्थांनी जवळच्याच शिहू गावात आसरा घेतला. मुळगाव मात्र आता ओस पडलंय.


गाव विस्थापित झालं असलं तरी मुंढाणी ग्रामपंचायतीचं अस्तित्व मात्र कायम राहिलंय. जवळपास १३६१ मतदार असलेल्या मुंढाणी ग्रामपंचायतीची येत्या १६ ऑक्टोबरला निवडणूक होतेय. मात्र, १ हजार ३६१ पैकी तब्बल १२०० मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाली आहेत.


फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या मतदारांनी मुंढाणीचे मतदार म्हणून मतदानही केलं होतं. मात्र, अचानक नावं यादीतून गायब झाल्यानं हे मतदार बुचकळ्यात पडलेत. आता केवळ १३४ मतदार असलेल्या मुंढाणी ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याचा घाट प्रशासनानं घातलाय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय.


बाराशे मतदार शिहू गावात रहात असल्यानं आपल्याला शिहू ग्रामपंचायतीत समाविष्टम करावं अशी मागणी या नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे केली. मात्र, गेल्या २५ वर्षांत त्याकडे केवळ डोळेझाक करण्यात आली. आता तर त्याची अवस्था 'ना घर का न घाट का' अशी झालीय. यासंदर्भात ग्रामस्थांनी तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रारींचा ओघ सुरूच ठेवलाय.


नावं वगळलेल्या मतदारांनी आता राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असून ही निवडणूक स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.