अवघ्या १३ व्या वर्षी तिने लिहिलं शाहु महाराजांचं चरित्र
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याच्या आढावा घेणारं अजून एक पुस्तक...
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याच्या आढावा घेणारी अनेक चरित्र ग्रंथ, पुस्तके उपलब्ध आहेत. त्यात आणखी एका पुस्तकाची भर पडलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी इथल्या तेरा वर्षीय गायत्री शिंदे या शाळकरी विद्यार्थिनीनं या चरित्र पुस्तकाचं लेखन केलंय. माझा राजा शाहू राजा हे पुस्तक गायत्रीने लिहलंय. इस्त्री व्यवसायिकाच्या घरात जन्मलेल्या गायत्रीनं वयाच्या आठव्या वर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरचा पोवाडा ऐकला होता. तेव्हापासून तिने शाहू महाराजांच्या कार्याची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्या संदर्भात तिनं हे पुस्तक लिहिलंय. राजर्षी छत्रपती शाहु जयंतीच्या पुर्वसंधेला या पुस्तकाचं प्रकाशन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं. लहान मुलाना समजेल अशा सोप्या आणि चित्ररूपी भाषेत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय. आपल्या मुलीने लहान वयातच लिहिलेल्या या पुस्तकामुळे तिचे आईवडील भारावलेत. तर हे पुस्तक सर्वासाठी प्रेरणादायी असेल असा विश्वास देखील व्यक्त केलाय.