मुंबई : नागपूरमध्ये आलेल्या महापूरामुळे घरं, गावं, शेतीचं मोठं नुकसान झालं. गावच्या गावं पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. तीन दिवसात झालेल्या पुराने अनेकांचं होत्याचं नव्हतं झालं. या पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी तातडीची मदत जाहीर केली आहे. 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरामुळे अनेक घरांची मोठी पडझड, नुकसान झालं असून अनेक झोपड्या नष्ट झाल्या आहेत. अनेक वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. या निधीतून पूरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत आणि मदत छावण्यांमध्ये असलेल्या नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय देखभाल या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. 


मुख्यमंत्र्यंनी जाहीर केलेल्या निधीतून, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहाय्य, जखमी व्यक्तींना मदत, नैसर्गिक आपत्तीमुळे घरं पूर्णतः वाहून गेली असल्यास किंवा त्याचं नुकसान झालेल्यांसाठी 8 कोटी 86 लाख 25 हजार जाहीर करण्यात आले आहेत. अंशतः पडझड झालेली कच्ची-पक्की घरं तसंच नष्ट झालेल्या झोपड्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी  7 कोटी 15 लाख रुपये, मदत छावण्यांसाठी 47 लाख रुपये असा एकूण 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपयांचा निधी पूरग्रस्तांसाठी दिला जाणार आहे.


दरम्यान, पूराचा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला मोठा फटका बसला आहे. पूर्व विदर्भातील महापुरात ज्यांची शेती पुरामुळे नष्ट झाली, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचं, मदत व पूनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. मात्र शेतकऱ्यांकडून हेक्टरी 50 हजार देण्याची मागणी करण्यात आली आहे.