सरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
नाशिक जिल्हा रूग्णालयात नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. या कक्षाची क्षमता फक्त १८ बालकांची आहे. मात्र इथे ५० बालकांची भरती करण्यात येते. जन्मतः कावीळ असलेल्या, वजन कमी असलेल्या, श्वसन क्रीयेस त्रास असलेल्या तसंच कुपोषीत बालकांना काचेच्या पेटीत ठेवलं जातं. या उपचारांचा खर्च अधिक असल्याने बरेच रूग्ण जिल्हा रूग्णालयातच येत असतात. १८ बालकांची क्षमता असतानाही इथे पन्नास ते बावन्न बालकं भरती होतात. एका इन्क्युबेटरवर तीन ते चार बालकं ठेवली जातात. यामुळे लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
गेल्या सहा महिन्यात म्हणजे एप्रिलपासून बालक दगावण्याची संख्या वाढत आहे. एप्रिलपासून १८७ बालकांचा इथे मृत्यू झालाय. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक बालकं इथे दगावली. यामुळे पालकांच्या मनात भिती निर्माण झालीय. उपचार पद्धती जुनीच वापरली जात असल्याने बालकांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचं दिसून येतंय. उपचाराची मशिनरी जुनीच असल्याने योग्य उपचार होत नसल्याची कबुली रूग्णालयानं दिलीय.
२१ कोटी रूपयांचा निधी उपचार प्रणाली आधुनिक करण्यावर खर्च करण्यात आला. मात्र महापालिकेच्या परवानगी अभावी बांधकामं बंद आहेत. गेल्या काही दिवसांपासून उपचारांअभावी लहान बालकांचं दगावण्याचं प्रमाण वाढलंय. गोरखपूरमध्ये २९०, फारूखाबादमध्ये ५० तर अमरावतीतल्या घटना पाहता दुर्लक्षामुळेच बालमृत्यू वाढले असल्याचं दिसून येतं. त्यामुळे आता तरी या प्रकरणातली हलगर्जी सोडून आरोग्य यंत्रणांची फेरतपासणी करण्याची आवश्यकता आहे.