Laser Effects on Eyes: बाप्पाचे आगमन झाले आहे. शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पा विराजमान झाले. अलीकडे सार्वजनिक गणेश आगमन मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकांमध्ये लेझर लाइटचा वापर केला जातो. मात्र या लेझर लाइटचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातही असाच एक प्रकार घडला आहे.  मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाच्या डोळ्यातून लेझर किरणांच्या प्रखर विद्युतझोतामुळे रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे. तर, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस हवलदाराच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुण गणपती आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्याचवेळी लेझर किरणांच्या लेझर किरणांच्या प्रखर विद्युतझोतामुळे रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे. हा तरुण उचगाव मधील रहिवाशी आहे. त्याच्यावर शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी गणेश मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभारलेल्या एका पोलिसाच्या डोळ्यालाही या लेझर किरणांमुळे इजा झाली. संबंधित कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


युवराज पाटील असं या हवालदार पोलिसाचे नाव आहे. एकीकडे कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेश विसर्जन असो किंवा मिरवणूक यामध्ये लेझर शो वापरावर बंदी घातली आहे अशी भूमिका घेतली, पण सर्रास गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र गणेश आगमन मिरवणुकीमध्ये थेट लेझर शो मोठ्या प्रमाणात वापरल्याच दिसून आलं आहे.


दरम्यान, या आधीही असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या लेझर लाइटकडे एकटक पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. लेझर लाइटचे किरण नेत्रपटलाच्या मध्यभागी पडल्याने उष्णता तयार होऊन पडद्याला जखम होते. नेत्रपटलाच्या खाली रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्यांना इजा पोहोचल्याने नेत्रपटलाखाली रक्तस्त्राव सुरू होतो. रक्तस्त्राव सुरू झाल्याने वाचनशक्ती आणि डोळ्यांची क्षमताही कमी होण्याची भिती असते. त्यामुळं लेझर लाइटचा वापर टाळावा, असं अवाहन करण्यात येते. 


लेझर लाइट व डीजेचा आवाज या दोन्ही गोष्टींमुळं इजा होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. डिजेच्या आवाजामुळं हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता लेझर लाइटमुळं दोघा जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे.