कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये तानाजीनगरमध्ये २ वर्षांच्या चिमुरडीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरच्या गच्चीतून पडून मृत्यू झाला. अनिता देवव्रत तोमर असं या मुलीचं नाव आहे. थोडासा निष्काळजीपणाही कसा जीवावर बेतू शकतो ते यातून समोर आलंय. 


या दाम्पत्याची मुलगी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवव्रत आणि आश्लेषा तोमर या दाम्पत्याची ही गोजिरवाणी मुलगी. पण तिच्यावर काळाने घाला घातला. चिंचवडच्या मेट्रोपॉलिटीन या उच्चभ्रू वसाहतीत हे तोमर दाम्पत्य राहतं.


कशी घडली घटना?


दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला अनिता टेरेसमध्ये खेळायला गेली. त्यावेळी घरात अनिताची आई आश्लेषा तिचे आजोबाही होते. पण त्यांचं अनिताकडे लक्ष नव्हतं. काही वेळ तिच्याकडे दुर्लक्ष झालं असतानाच अनिता टेरेसमध्ये गेली आणि रेलिंगवर चढून खेळू लागली. त्यातच तिचा तोल जाऊन ती थेट नवव्या मजल्यावरून खाली पडली. यात तिचा अंत झाला. 


दुर्लक्षामुळे गेला चिमुकलीचा जीव


शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. त्यात राहणाऱ्या पालकांनी मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं हेच या घटनेतून अधोरेखित होतंय. अर्थात अनिताच्या पालकांची याच चूक होती असं अजिबात नाही. पण थोड्याशा दुर्लक्षाची केवढी भयानक किंमत मोजावी लागली हे या घटनेतून दिसून येतं.