पुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 20 दिवसांसाठी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. गोखले पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित केला आहे.
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेकडून पुन्हा एकदा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांसाठी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अंधेरीतील एसव्ही रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेकडून हा ब्लॉग घेण्यात आला आहे.
अंधेरी स्टेशन परिसरातील गोखले पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. पुलाच्या कामासाठी महापालिकेने रेल्वेला ब्लॉक घेण्याची विनंती केली होती. रेल्वेने ही विनंती मान्य करुन पुलाच्या कामासाठी 20 दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. गोखले पुलाचा एक महत्त्वाच्या गर्डर उभारणीच्या कामासाठी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक हा रात्रकालीन असून रोज तीन चे चार तासांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. रेल्वेकडून काहीच दिवसांत ब्लॉक शेड्युल केल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये पुलाचा उत्तरेकडील गर्डर उभारण्यात आल्यानंतर आता दक्षिणेकडील गर्डर उभारण्यात येणार आहे.
गोखले पुलासाठी 27 नोव्हेंबरपासून 20 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने पुढील आठवड्यापासून लोकल प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा यासाठी रेल्वेकडून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
1975 मध्ये गोखले पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. 90 कोटी रुपये खर्चून आता पुलाची पुर्नबांधणी केली जात आहे. पालिकेने नोव्हेंबर 2023मध्ये पुल खुला करण्याची योजना केली होती. मात्र काही कारणास्तव काम पूर्ण होण्यास विलंब झाला. आता फेब्रुवारी 2024 मध्ये पुल वाहतूकीसाठी पुन्हा खुला करण्याचे प्रयत्न महापालिकेचे आहेत.
पुण्यात शनिवारी-रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक
खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार, रविवार विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. याचबराेबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ४६ सेवा रद्द केल्या आहेत.