अमर काणे, नागपूर : गेल्या पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा शिरकाव होत असल्यानं हे हल्ले वाढलेत...? की जंगलामध्ये मानवी अतिक्रमण वाढल्यानं हे हल्ले होतायत...? पाहा हा रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानव आणि वन्य प्राणी यांच्यातला संघर्ष अगदी आदिमानव युगापासून चालत आलेला. पण गेल्या काही वर्षांत हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. कारण जंगल आणि मानवी वस्त्या यांच्यातील सीमारेषाच दिवसेंदिवस पुसट होत चालली आहे. त्यामुळं आपला अधिवास कोणता, हेच वन्य प्राण्यांना कळेनासं झालं आहे. त्यातूनच भरवस्तीत वाघाचं दर्शन, लग्नाच्या मंडपात वाघाची उपस्थिती, चंद्रपूरच्या जंगलात वाघानं मजुरांचे डबे आणि घमेली पळवणं, रस्ता ओलांडताना वाघाचा झालेला मृत्यू असे प्रकार वाढलेत. एवढंच नव्हे तर प्रसंगी स्वतःच्या बचावासाठी वन्यप्राणी माणसांवर हल्ले करत आहेत.


गेल्या पाच वर्षांत अन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 217 नागरिकांना जीव गमवावा लागला. तर 2 हजार 176 जण जखमी झाले आहेत.


2013 मध्ये 46,
2014 मध्ये 38,
2015 मध्ये 39,
2016 मध्ये 52,


2017 मध्ये 42 जणांचा मृत्यू झाला आहे.


या मृत्यूंना माणसंच जबाबदार असल्याचं सांगितलं जातंय. वन्यप्राण्यांचं निवासस्थान असलेल्या जंगलात माणसांनी घुसखोरी केल्यानं त्यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं वन्य जीव अभ्यासक सांगतात.


मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील हा संघर्ष आटोक्यात आणायचा असेल तर त्यासाठी निसर्ग आणि वन्य जीव यांच्याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. असं झालं तर मानवी मृत्यूही थांबतील आणि वन्यजीवांचेही रक्षण होईल.