कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाण्यात गेल्या सहा महिन्यात २४४ जणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली... या आत्महत्या वाढण्याचं कारण काय? आत्महत्या रोखण्यासाठी नेमकं काय करावं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या श्रद्धा लाड यांच्या आत्महत्येनं दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण ठाण्यात खळबळ उडवून दिली. आत्महत्येचे विचार टाळण्यासाठी सामान्य लोक मानसोपचार तज्ज्ञांकडं जातात. पण इथं तर मानसोपचार तज्ज्ञानंच आत्महत्या केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. 


कळव्यात एका विवाहितेनं आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवन संपवलं. ऐन दिवाळीच्या दिवशी किरकोळ घरगुती वादातून वैशाली गुंजकर या 32 वर्षीय महिलेनं गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काजुवाडी वागळे स्टेट भागात घडली. दोन दिवसापूर्वी एका ठेकेदारानं स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली.


जानेवारी ते जून 2017 या सहा महिन्यात ठाण्यात तब्बल 244 जणांनी आत्महत्या केलीय...
नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 18 हजार 112 जणांनी आत्महत्या केल्या.
आत्महत्येच्या घटनांमध्ये तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
गेल्या वर्षभरात भारतात १ लाख ८७ हजार तर जगात ८ लाख आत्महत्या झाल्या.
आत्महत्यांचं प्रमाण 15 ते 29 या वयोगटामध्ये सर्वाधिक आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगात 8 लाख लोक आत्महत्या करून जीव गमावतात... एखाद्या युद्धात किंवा दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडणा-या लोकांपेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणा-यांची संख्या जास्त आहे.


आत्महत्येच्या सर्वाधिक घटना कौटुंबिक कलहामुळं घडतात...नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या आकडेवारीनुसार कौटुंबिक समस्यांमुळं सुमारे 35 हजार लोकांनी आत्महत्या केल्या.आजारपणाला कंटाळून 30 हजार लोकांनी, मानसिक आजारांमुळं 9 हजार, विवाहामुळं 8 हजार, प्रेमप्रकरणांमुळं 6 हजार, कामाचा ताण आणि बेरोजगारीमुळं 5 हजार
आणि व्यसनाधीनतेमुळं 4 हजार लोकांनी आपलं जीवन संपवलं, असं ही आकडेवारी सांगते.


आत्महत्येचे विचार मनात येऊ नयेत, यासाठी उपाय 


नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम या माध्यमातून मनःशांती ठेवावी.
कितीही कठीण परिस्थिती असली तरी स्वतःला आनंदी ठेवावे.
मानसिक आजार वेळीच ओळखून त्यावर उपचार करुन घ्यावेत.
नैराश्यग्रस्तांशी कुटुंबीय, मित्रमंडळींनी संवाद साधावा, अशा उपायांचा त्यात समावेश आहे.


वाढत्या आत्महत्या ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हे जीवन सुंदर आहे... हा मंत्र प्रत्येकानं स्वीकारला तर निश्चितच या समस्येवर मात करता येईल.