25 Died In Samruddhi Accident and BJP Was Celebrating: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या शपथविधीवरुन भारतीय जनता पार्टीबरोबरच सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारस सिंदखेड राजा येथे झालेल्या भीषण बस अपघातात मरण पावलेल्या 25 जणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चिता जळत असतानाच राजभवनामध्ये शपथविधी पार पडला, पेढे वाटले गेले, मिठ्या मारल्या जात होत्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकीकडे महाराष्ट्रावर हे संकट आलेलं असताना, सामुदायिक अत्यंविधी पार पडत असताना झालेला हा शपथविधी म्हणजे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासणारा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


या दुर्घटनेला 24 तास होत नाही तोच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांच्या शपथविधीवर भाष्य केलं आहे. "कालपर्यंत शरद पवारही कोणाचे तरी गुरु होते. पण गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुला दगा देण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही काळापासून दगाजाबीचं राजकारण सुरु झालं आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातात 25 जण जळून खाक झाले. त्यांच्या चिता जळत असताना ज्या घाई घाईनं राजभवनावर शपथविधीचा सोहळा राजभवनावर पार पडला. हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे. एक दिवस थांबता आलं असतं. बारामतीमधील 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील लोक मरण पावलेत. प्रेत पडली आहेत. प्रेतांची ओळख पटत नाही. नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. या दुर्घटनेला 24 तास होत नाही तोच महाराष्ट्रातील हे लोक राजभवनामध्ये पेढे वाटत होते, मिठ्या मारत होते, फटाके वाजवत होते. शपथ घेत होते. या महाराष्ट्राने इतकं निघ्रृणपणाचं राजकारण कधीच पाहिलं नाही. घाई होती शपथ घ्ययाची. पण एक दिवस थांबायला हवं होतं. चितांची आग विझू द्यायला पाहिजे होती. पण दुर्देवाने महाराष्ट्राने काल जे चित्र पाहिलं ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळं फासणारं आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


मोठी किंमत मोजावी लागणार


"एक दिवस थांबता आलं नाही? 25 जणांचा मृत्यू झाला आहे. हे शपत घेत असताना सामुदायिक अंत्यसंस्कार सुरु होते. त्यावेळेस तुम्ही पेढे वाटत होता, मिठ्या मारत होता. हा काय प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे? याचे प्रणेते कोण आहेत? महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं जे काम सुरु आहे त्याची फार मोठी किंमत भाजपाला आणि या सर्वांना चुकवावी लागणार आहे," असा इशारा संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.