महाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणार
ST Bus Maharashtra: एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणखी 2500 डिझेल गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ST Bus Maharashtra: महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे एसटी. गावागावात आणि खेड्यापाड्यात लाल परी धावते. त्यामुळं खेड्यापाड्यातील नागरिकांना प्रवासासाठी एक साधन आहे. आता लालपरी आणखी वेगाने धावणार आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत. पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एसटी महामंडळाची अलीकडेच 304 बैठक पार पडली. या बैठकीत 70हून अधिक विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली आहे. एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणखी २५०० डिझेल बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. त्यानुसार महामंडळ येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबविणार असून, पुढच्या वर्षी नव्या गाड्या दाखल होतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
एसटीला नेहमी फायद्यात ठेवण्यासाठी जुनी येणी वसूल करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 200 कोटी वसूल करण्यात आले आहेत. पुढील सहामाहीतही तेवढेच उत्पन्न अपेक्षित आहे, अशी माहिती डॉ. माधव कुसेकर यांनी दिली आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात 14,000 बसगाड्या आहेत. त्यापैकी 5000 गाड्या एलएनजीमध्ये आणि 1000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार आहे.
एअर होस्टेसच्या धर्तीवर `शिवनेरी सुंदरी´
पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता `शिवनेरी सुंदरी´ नेमणार आहे.
बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा
एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मूल व धारणी येथे नवे आगार निर्माण होणार
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे.