`टोलनाक्यांशिवाय समृद्धी महामार्गावर प्रवास नाहीच`
समृद्धी महामार्ग प्रकरणी नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. तर आता समृद्धी महामार्गावर टोल नाके असणार अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई : समृद्धी महामार्ग प्रकरणी नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. तर आता समृद्धी महामार्गावर टोल नाके असणार अशी माहिती समोर आली आहे. त्याबाबत या महामार्ग उभारणीची जबाबदारी असलेले कॅबिनेट मंत्री (MSRCD प्रकल्प) एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
शेतक-यांशी तडजोडीने आम्ही समृद्धी महामार्ग आम्ही पूर्ण करू. ज्या ठिकाणी विरोध होतोय त्या शेतकऱयांशी आम्ही बोलतोय, त्यांच्या शंकांचं निरसन करतोय. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची सुरुवातीपासून भूमिका शेतकऱयांच्या बाजूनं राहिली आहे. सर्व ठिकाणी शेतकऱयांच्या संमतीने काम सुरु आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे त्या शेतकऱयांशी मी स्वतः बोलेन. त्यांना योग्य मोबदला मिळेल. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी मी घेईन. ज्या शेतकऱयांच्या मनात राग आहे तो दूर करण्यासाठी मी आणि माझे अधिकारी स्वतः त्यांच्याशी बोलतील.
टोकनाके माहिती नाही
समृद्धी महामार्गाचे मॉडेल अगदी प्रायमरी स्टेजला आहे. टोल वैगरे रस्त्याचं काम सुरु झाल्यावर ठरेल. हा विषेश रस्ता आहे. १५ तासांचे अंतर ६ ते ७ तासात पार करता येणार आहे. समृद्धी महामार्गावर टोल आकारण्यात येईल. पण किती टोलनाके असतील ते आता सांगता येणार नाही.
३१ टोलनाके
एकीकडे किती टोलनाके असणार हे सांगता येणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणत असले तरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर येणार ३१ टोल असणार आहेत. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आलीय. ७०० किमीच्या या महामार्गावर १५०० ते २००० रुपये टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त झी २४ तासनं गेल्या आठवड्यात दाखवलं होतं. टोल अभ्यासक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे.