संजय पाटील, मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. महायुती आणि आघाडी झाल्यामुळे अनेक ठिकाणी बंडोखोरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा फटका सगळ्याच पक्षांना बसण्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अनेक मतदारसंघामध्ये एकाच नावाचे २ उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये काहीसं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. 


नाव एक उमेदवार अनेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक २०१९ च्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले एकूण ४ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, अशी संभ्रमावस्था दापोलीतील मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.


दापोली मतदारसंघातून यंदा एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवसेनेकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. योगेश कदम हे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पूत्र आहेत.


विशेष म्हणजे याच मतदारसंघातून नामसाधर्म्य असलेले आणखी एक योगेश कदम हे अपक्ष उभे आहेत.


दापोलीतून नामसाधर्म्य असलेले आणखी एकूण ४ उमेदवार आहेत. यापैकी ३ उमेदवार हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर एक उमेदवार आघाडीचा आहे.


एकाच नावाचे ४ उमेदवार


१. संजय दगडू कदम (अपक्ष)
२. संजय सीताराम कदम (अपक्ष)
३. संजय संभाजी कदम (अपक्ष)
४. संजयराव वसंत कदम (राष्ट्रवादी)


१. योगेश रामदास कदम (शिवसेना-महायुती)
२. योगेश दिपक कदम (अपक्ष)


नामसाधर्म्यचा मोठा फटका राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बसला होता. सुनील तटकरे यांची खासदारकी अवघ्या २११० मतांच्या फरकाने हुकली होती.


रायगड लोकसभा मतदारसंघातून २०१४ साली सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला ९ हजार ८४९ मतं मिळाली होती. याचाच फटका राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना बसला होता.