महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचं भाकित! `त्या` 40 आमदारांची महिन्याभरात `घरवापसी`?
40 MLA Will Return To Original Parties: अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मूळ पक्षातील अनेक आमदार गेले असून ते सत्तेत सहभागी झाले आहेत. राज्यात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या राजकीय भूकंपाचं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
40 MLA Of Ajit Pawar Eknath Shinde Fraction Will Return: लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएचे घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीबरोबरच एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला महाविकास आघाडीने मोठा धक्का दिला. लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीने 31 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं. एनडीएच्या एकाही पक्षाला जागांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय जनता पार्टीला केवळ 9 जागांवर विजय मिळाला. तर शिंदे गटाने 7 आणि अजित पवार गटाने केवळ एक जागा जिंकली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. अशातच आता काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याने अजित पवार आणि शिंदे गटातील आमदारांपैकी 40 आमदारांची घरवापसी महिन्याभरात होईल अशी भविष्यवाणी केली आहे.
महायुतीमधील घडामोडींना वेग
लोकसभेच्या निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे संघटना बांधणीकडे लक्ष देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपाच्या वाईट कामगिरीची संपूर्ण जबाबादारी स्वीकारत थेट पदाचा राजीनामा देण्याची ऑफर दिली आहे. 'मला सरकारमधून मोकळं करा,' अशी मागणी दिल्लीतील वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीस यांनी लोकसभा निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकारपरिषदेमध्ये सांगितलं. तर दुसरीकडे अजित पवार गटाला केवळ रायगडच्या जागेवर यश मिळालं असून या गटाचे प्रमुख असलेल्या अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाल्याची राज्यभर चर्चा आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाला घवघवीत यश मिळाल्याने एकनाथ शिंदे गटाच्या मुंबईतील प्रभावासंदर्भात राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
नक्की वाचा >> 'भाजपाचे गुलाम, आश्रयित...', मोदींच्या मंत्रिमंडळात एकच राज्यमंत्रिपद मिळाल्यावरुन CM शिंदेंना टोला
राजकीय भूकंपाचं भाकित
4 जून रोजी लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभेच्या तयारीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं असतानाच दोन्ही बाजूने वेगवगळे दावे केला जात आहेत. यामध्ये आता काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्याची भर पडली आहे. वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर मूळ पक्ष सोडून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी बरेच जण स्वगृही म्हणजेच मूळ पक्षात परततील असा दावा केला आहे. पुढील महिन्याभरामध्ये राज्यात हा मोठा राजकीय भूकंप होईल असं भाकित वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> '..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत नेत्याचा दावा
नेमकं ते विधान काय?
"(मूळ पक्ष सोडून) गेलेले अजित पवार गटाचे असो किंवा शिंदे गटाचे असो. पुढच्या महिन्याभरामध्ये या दोघांचे मिळून 40 आमदारांची घरवापसी होईल, अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. तशापद्धतीने हे लोक संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे. हे होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. महाराष्ट्रातील वारे आता महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहेत," असं पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.