अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या प्रदीप मुलानी या टॅटू आर्टिस्टने वेगवान टॅटू काढण्याचा (गोंदण्याचा) नवा विक्रम केल्याचा दावा केला आहे. त्याने २२ तासात ४४८ टॅटू काढले आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डसाठीचे सर्व निकष पूर्ण करत हा विक्रम केल्याचंही प्रदीपनं सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ३ वर्षांपासून प्रदीप मुलानीने टॅटू आर्टिस्ट म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून त्याने टॅटू काढण्याच्या नव्या विक्रमाला सुरुवात केली. २२ तासात तब्बल ४४८ टॅटू काढत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता त्याचा टॅटूचा विक्रम पूर्ण झाला. यापूर्वी हा विक्रम कॅट वोन डी या टॅटू आर्स्टिस्टच्या नावावर होता. त्याने २४ तासात ४०० टॅटू काढले होते.



विशेष म्हणजे प्रदीपने त्याच्या प्रयत्नात एका तरुणाच्या शरिरावर सर्वाधिक म्हणजेच २२३ टॅटू काढले आहेत. तर इतर टॅटूज २० व्यक्तींच्या शरिरावर काढले. प्रदीपच्या या संपूर्ण प्रयत्नांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डसच्या निकषांप्रमाणे चित्रीकरण करण्यात आहे. लवकरच हे सर्व चित्रीकरण आणि पुरावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डसकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर प्रदीपच्या या प्रयत्नांवर शिक्कामोर्तब होऊ शकणार आहे.