नांदेड हादरले! 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या, नंतर झुडुपात मृतदेह फेकून दिला
Nanded Crime News: 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Nanded Crime News: अवघ्या 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणारी मुलगी आपल्या घराशेजारी असलेल्या शाळेसमोरील मैदानात खेळत होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ही मुलगी मैदानातच खेळत होती मात्र, खेळता-खेळताच ती गायब झाली.
संध्याकाळी 6 वाजेपर्यंतही मुलगी परत न आल्याने कुटुंब भयभीत झाले. कुटुंबीय आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून तिचा शोध सुरू केला. तरीही मुलगी सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुदखेड पोलीसांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण मुलगी सापडली नाही. त्यानंतर काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी सकाळी या मुलीचा मृतदेह मुदखेड जवळच्या उमरी रोडवर आढळून आला.
मुख्य रस्त्याशेजारी झुडुपातच चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलीच्या अंगावर अर्धवट कपडे असल्याने अज्ञात नराधमाने केलेल्या क्रुरतेचा प्राथमिक अंदाज आला होता. चिमुकलीचा मृतदेह जिथे आढळला ते ठिकाण तिच्या गावापासून 12 किलोमीटर दूर आहे. या चिमुकलीवर अत्याचार करून अज्ञात नराधमाने तिची हत्या केल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी अत्याचार, हत्या आणि अन्य कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपीच्या शोधासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांची वेगवेगळी पथकं तैनात केली असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पिडित कुटुंबाची घेतली भेट
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी 16 जानेवारी पीडितेच्या गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबाचे सांत्वनही त्यांनी केले. ही घटना अतिशय चीड निर्माण करणारी असून पोलीसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली.
भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षानी केला संताप व्यक्त
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर यांनीही गावात जाऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. घटनेबाबत संताप व्यक्त करत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली.