काळ्या मातीत राबलेल्या शेतकऱ्याचा रिटायरमेंट सोहळा
शेतकऱ्याचा निवृत्ती सोहळा
माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा: सरकारी निमसरकारी कर्मचारी रिटायर होतात. पण कधी शेतकरी रिटायर झाल्याचं तुम्ही ऐकलंय का? भंडाऱ्यात हे घडलंय. साठ वर्ष शेतात राबलेल्या शेतकऱ्याचा रिटायरमेंट सोहळा धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी या गावातली ही मिरवणूक निकाली. ही मिरवणूक आहे रिटाय़रमेंटची. ६० वर्षे शेतीत राबलेल्या गजाजन काळे हे शेतकरी वयाच्या ऐंशीव्या वर्षी निवृत्त झालेत. गजाननरावांनी आयुष्यभर शेती केली. गजाननरावांनी काळ्या आईच्या केलेल्या सेवेचा सन्मान म्हणून काळे कुटुंबीयांनी वाजत गाजत निवृत्ती समारंभ साजरा केला. 'शेतकऱ्याच्या कामाची दखल कुणीही घेत नाही. तो शेतात दिवसरात्र राबतो. त्यांच्या कामाची दखल आम्ही घेत हा निवृत्ती सोहळा केल्याचं', त्यांचा मुलगा प्रकाश काळे सांगतो.
सरकारी कर्मचाऱ्यासारखा निवृत्ती समारंभ साजरा झाल्यानं गजाननरावांनाही मोठा आनंद झाला आहे. 'शेतीची काम मी आता थोडी सोडली. याचं मला दुःख वाटतं. शेतीची जबाबदारी आता मी मुलागकडे सोपवली आहे,' असं निवृत्त झालेले शेतकरी गजानन काळे सांगतात. गजाननराव आता शेतात जाणार नाही असं नाही. आयुष्यभर त्यांचं शेतीशी ऋणानुबंध कायम राहिल. पण प्रतिकात्मक का होईना त्यांचा झालेली रिटायरमेंट सगळ्याच शेतकऱ्यांना मनस्वी आनंद देणारी ठरली.
आयुष्यभर शेतात राबणाऱ्या एका शेतकऱ्याचा निवृत्त सोहळा पहिल्यांदाच संपन्न झाला होता. गावातच काय तर सगळीकडे या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. पंचक्रोशीत हा सोहळा पाहण्यासाठी लोकं उपस्थित होते. एक शेतकरी जो दुसऱ्यासाठी राबतो त्याचा असा सोहळा संपन्न झाला याचाच आनंद सगळ्यांना आहे.