6th Standard Girl Essay Answer Sheet Photo Goes Viral: सध्या परीक्षांचा काळा सुरु आहे. एकीकडे पालकांना विद्यार्थ्यांकडून अभ्यास करुन घेण्याचं टेन्शन असतं तर दुसरीकडे मुलांना सुट्टीची ओढ लागलेली असते. अनेकदा परीक्षेमध्ये मुलं उत्तरपत्रिकेत मजेदार उत्तरं लिहितात. असा उत्तरपत्रिकांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र दरवेळेस असे उत्तरपत्रिकेंचे फोटो मजेदारच असतात असं नाही. अनेकदा या चिमुकल्यांच्या इवल्याश्या कल्पनांमधून उत्तरपत्रिकेत उत्तराच्या माध्यमातून उतरलेले विचार पाहून शिक्षकही थक्क होतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका उत्तरपत्रिकेचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी या चिमुकल्या विद्यार्थीनीचं कौतुक केलं आहे.


व्हायरल फोटोमध्ये नेमकं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेला फोटो सहाव्या इयत्तेमधील विद्यार्थीनीच्या उत्तरपत्रिकेचा असून त्यावर अगदी स्वच्छ, निटनेटक्या आणि टापटीपित अक्षरामध्ये छोटासा निबंध लिहिला आहे. '15 ऑक्टोबर 'वाचन प्रेरणा दिन' या निमित्त शाळेत निबंध स्पर्धा आय़ोजित केली आहे. त्यासाठी तू पुढीलपैकी कोणत्या एका विषयावर लिही', असा प्रश्न 5 मार्कांसाठी विचारण्यात आला होता. यासाठी पहिला पर्याय 'मला आवडलेले पुस्तक' हा होता. दुसरा पर्याय 'पुस्तक बोलू लागले तर...' आणि तिसरा पर्याय 'वाचनाचे महत्त्व' हा होता. यापैकी शेवटचा पर्याय निवडून चिमुकलीने सुंदर हस्ताक्षरामध्ये निबंध लिहिला. हा निबंध वाचून तुम्हाला तिचं अक्षर सुंदर आहे की विचार अधिक सुंदर आहेत असा प्रश्न नक्कीच पडेल.


निबंधात काय लिहिलं आहे पाहूयात...


आयुष्यात वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.


आपण वाचन करायचे म्हटले तरी आपल्याला प्रश्न पडतो, काय वाचावे बरे? पण हा प्रश्न त्यालाच पडतो ज्याला माहितीच नाही की त्याने तर अजून समुद्रातला एक थेंबही नाही वाचला.


आजकालच्या जगात मुलं गोष्टींच्या दुनियेपेक्षा मोबाईल व टीव्हीच्या दुनियेत असतात. मुलांनी तर वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तकं वाचली पाहिजेत. लहानपणी त्यांना गोष्टी वाचल्यावर मजा येते. परंतु त्यांना त्याचं महत्त्व मोठं झाल्यावर कळतं. आपलं जर वाचन असेल तर आपण कोत्याही प्रश्नाला सडेतोड उत्तर देऊ शकतो. वेगवेगळी भाषणं करु शकतो. मिळवलेलं ज्ञान कधीच वाया जात नाही आणि वर्तमानपत्र तर प्रत्येकाने वाचलच पहिजे. कारण आपल्याकडे ज्ञान असेल तरच आपण या जगात टिकू शकतो आणि हे ज्ञान आपल्याला फक्त आणि फक्त वाचनाने मिळतं.



अनेकांना आवडलं हे उत्तर


या चिमुकलीने मराठी विषयाच्या परीक्षेत लिहिलेलं हे पानभर उत्तर अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. सदर फोटो 2017-18 साली झालेल्या परीक्षेतील असला तरी आता तो व्हायरल झाला असून बऱ्याच जणांनी तिच्या हस्ताक्षराबरोबरच विचारांचंही कौतुक केलं आहे. खरोखरच या चिमुकलीला जे कळलं ते अनेकदा सज्ञान लोकांनाही समजत नाही असंही अनेकांनी या पत्रासंदर्भात म्हटलं आहे.