COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड :  दिया जाईलकर हत्या प्रकरणी आरोपी सूरज करकरेला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपीला माणगाव कोर्टात हजर करण्यात आलं आहे. माणगाव बार असोसिएशनने आरोपीचे वकीलपत्र घेण्यास विरोध दर्शवला. दियाची हत्या करण्यासाठी सूरजला कुणाकुणाची साथ लाभली आणि लैंगिक अत्याचाराच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यानुसार आरोपीला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.


सात वर्षीय दिया जाईलकर हिचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना रायगडच्‍या माणगाव तालुक्यातील वावे गावात घडली होती. अपहरणानंतर चार दिवसांनी दियाचा मृतदेह गावातील एका बंद घरात आढळून आला. आणि तिची निर्घूण हत्या झाल्याचं उघड झालं होतं.यानंतर सलग तीन दिवस रायगड पोलीस सहा पथकांव्दारे या गुन्ह्याचा तपास करीत होते. दिया जाईलकर अवघ्या ७ वर्षाची निरागस चिमुकली होती. या चिमुकलीचं अपहरण करुन हत्या करण्यात आली. तिच्या हत्या प्रकरणानंतर रायगडमधील माणगाव तालुका हादरुन गेला.


सर्वत्र संतापाचं वातावरण होतं. नागरिकांनी बंद पाळून निषेध केला. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. तीन दिवसरात्र अनेकांची चौकशी केल्यानंतर गावातल्याच सूरज करकरे या नराधमानं दियाची हत्या केल्याची कबूली दिली आहे.