आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : चोरट्यांनी सोनं, दागिने, पैसे लुटल्याच्या अनेक घटना दररोज घडत असतात, आपण आपल्या आजुबाजूलाही अशा अनेक घटना पहात असतो ऐकत असतो. पण डोंबिवलीत चोरीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीत नव्याने उभारल्या जाणाऱ्या एका मोठ्या गृहसंकुलात पाच जणांच्या टोळीने चक्क एसीच चोरले आणि तेही एक दोन नाही तब्बल 78 एसी या टोळीने लंपास केले. डोंबिवली पूर्व इथल्या दावडी इथं हा प्रकार घडला असून याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. 


एसीची अशी होत होती विक्री


धक्कादायक म्हणजे हे चोरटे फेरीवाल्यासारखं रस्त्यात उभं राहून एसी विकत असतं. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या नादात या पाच जणांनी एसीची चोरी केल्याचं तपासात उघड झालं आहे.


नेमकी घटना काय?


डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोड जवळ दावडी परिसरात एका मोठे गृह संकुल उभारण्याचं काम सुरु आहे. या गृहसंकुलातील प्रत्येक फ्लॅटमध्ये तीन एअर कंडिशन लावून देण्याचे काम देखील सुरु आहे. यासाठीच या गृह संकुलाच्या प्रत्येक मजल्यावर एसी आणून ठेवण्यात आले होते. एसी बसवण्याचे काम सुरू असताना इथल्या सुपरवायझरला 78 एसी चोरीला गेल्याचे लक्षात आलं. याप्रकरणी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


असा लागला चोरीचा छडा


पोलीस तपासादरम्यान विनोद महतो नावाचा एक तरुण याच गृहसंकुलातील एका सुरक्षारक्षकाला भेटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विनोद काही दिवसांपूर्वी गृहसंकुलात काम करत होता आणि नुकतंच त्यांनी काम सोडलं होतं. चोरीच्या घटनेनंतर विनोद या ठिकाणी फिरकला नसल्याने पोलिसांचा विनोदवर संशय बळावला.  


मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक दृष्ट्या तपासाची सूत्रे फिरवत पोलिसांनी रहेमान खान आणि दीपक बनसोडे या दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता विनोद महतो, सलीम रशीद आणि आदील कपूर या तिघांना बेड्या ठोकल्या. या पाचही जणांनी मिळून गृहसंकुलातील 78 एसी चोरी केले. त्यापैकी 20 एसी पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तर उर्वरित एसी या चोरट्यांनी वसईमध्ये रस्त्यावर उभे राहून फेरीवाल्यांना प्रमाणे विकल्याचं तपासात समोर आलं आहे.