विशाल करोळे, झी मीडिया,  औरंगाबाद : दिवसभर टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळं एका आजीबाईंनी स्वतःचा जीव वाचवला आणि चोराला धडाही शिकवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमधल्या चंद्रभागा आजी.... वय वर्षं ८५... वयोमानानुसार आता ऐकायलाही थोडं कमीच येतं... हातही आता थोडे थरथरतात... पण आजीबाईंची हिंमत म्हणाल तर तरूणांनाही लाजवेल अशी... आजी त्यांचा मुलगा आणि सुनेसोबत सिडको भागात राहतात... सकाळी देवपूजा करायची, मग मंदिरात जायचं आणि दिवसभर टीव्ही बघायचा आणि थोडी फार कामं करायची असा आजींचा दिनक्रम...


चोराशी दोन हात...


गेल्या आठवड्यात आजी अशाच देवदर्शनासाठी निघाल्या... रस्त्यावर समोरून एक टोपी घातलेला तरूण अचानक आजींच्या जवळ आला... त्यानं एकदम आजींच्या गळ्याला हात घातला. चंद्रभागाबाई सावध झाल्या. त्यांनी त्याचा हात घट्ट पकडला... म्हातारीने हात पकडलाय, हिच्यात कितीसा जोर असणार म्हणून चोराने हिसका दिला.


मात्र, कसलेल्या चंद्रभागाबाईंची पकड जराही सैल झाली नाही. मग, त्याने दुसरा हात घातला आणि गळ्यातला पोत ओढायला सुरुवात केली. पण, चंद्रभागाबाईंनी दुसराही हात तितक्याच ताकदीने पकडला. एवढंच नाही तर त्या चोराला लाथ मारली... रांगडा तरुण असला तरी आजींच्या या जोरदार लाथेने तो कळवळला, पडला आणि धावत सुटला... आजींनी चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात केली... इतक्यात आजूबाजूचे लोक धावले आणि त्यांनी आजींना सावरलं.


सिनेमा पाहण्याची हौस


८५ वर्षांच्या आजी... पण एकाच फाईटमध्ये वातावरण टाईट करुन टाकलं... या सगळ्याची प्रेरणा आजींना मिळाली ती टीव्हीवर सिनेमांतले फायटिंग सीन बघून... आजींना सिनेमे पाहायला अतिशय आवडतात... विशेषतः त्यातले फायटिंग सीन्स... एकही फायटिंग सीन आजी चुकवत नाहीत... त्यामुळेच आज आजींच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुरक्षित राहिल्याचं त्या सांगतात..


सुरुवातीला ही घटना कळल्यानंतर आजींच्या घरचेसुद्दा घाबरले, मात्र आजी जराही घाबरल्या नाहीत.... ते पाहून त्यांना धीर आला... आजींच्या धाडसाचं त्यांनाही कौतुक आहे. 


खरं तर चोर आल्यावर भल्याभल्यांची गाळण उडते. मात्र या ८५ वर्षांच्या आजीनं दाखवलेल्या धाडसामुळं चोरही घाबरला आणि पळून गेला... टीव्हीवर फायटिंग सीन्स बघून चोराला धडा शिकवणाऱ्या या आजीबाईंनी लई भारीच कामगिरी करुन दाखवलीय.