पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग  (Samruddhi ExpressWay) प्रवासांसाठी खुला झाला आहे. लाखो प्रवासी या समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत आहेत.  शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. अपघातांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपायोजना आखण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर आठ समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 डिसेंबर 2022  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग  701 किमी लांबीचा आहे. समृद्धी महामार्गावर सहा लेन आहेत. हा महामार्ग 390 खेड्यांमधून जाते.  महाराष्ट्रातील दहा जिल्हे या मार्गात येतात. समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिशय जलद झाला आहे. मात्र, या मार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरत आहे. 


समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी आठ समुपदेशन केंद्र उभारणार 


समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवत आलेल्या 100 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडा 900 पेक्षा अधिक आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मागील तीन महिन्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात रोखण्यासाठी नागपूर ते शिर्डी दरम्यान 8 समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत. येत्या सात दिवसात ही समुपदेशन केंद्र कार्यन्वित होणार आहे.  मुंबईचे परिवहन उपायुक्त भरत कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली वायफळ टोल नाक्यावरील कार्यालयात ही समुपदेशन केंद्र सुरु केली जाणार आहेत.   परिवहन खाते आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बैठकीत समुपदेशन केंद्र सुरु करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय झाला.


समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे आणि कारवाईबाबतचे निर्णय


  • वेगाने वाहन चालवणे, टायर मध्ये हवा नसने

  • लेन शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल

  • अती वेगात वाहन चालवणे

  • नागपूर ते शिर्डी दरम्यान प्रत्येक जिल्यात एक प्रमाणे आठ समुपदेशन केंद्र उभारले जाणार

  • भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्याना थांबवून समुपदेशन केले जाणार

  • यात सक्तीच्या समुपदेशनात जवळपास 30 मिनिट ते 1 तास समुपदेशन केले जाणार आहे.  

  • वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना प्रथम रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणारी छायचिण दाखवली जाणार

  •  एक प्रश्नपत्रिका सोडवून घेत, नियमात वाहन चालवण्याचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे.

  • सर्व मार्गावर रस्ता सुरक्षा फलक लावले जाणार आहेत. 

  • टोल नाक्यावर पीए सिस्टिम लावले जातील.

  • ट्रक चालकांसाठी विश्रांती आणि पार्किंग व्यवस्था निर्माण केली जाईल.