...जेव्हा म्हशीनं गिळलं दीड लाखांचं मंगळसूत्र!
... तेव्हा साधनाताईंच्या काळजाचा ठोकाच चुकला
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : ही कथा आहे एका म्हशीची... पण ही पुलंची म्हैस नाही... पुलंची म्हैस एका एसटीसमोर आडवी आली आणि तिनं एकच धम्माल उडवून दिली... पण ही आहे खरीखुरी म्हैस... खटाव तालुक्यातल्या मांडवे गावातली... तिनं धम्माल नाही, तर कमाल केलीय... चक्क पाच तोळ्यांचं सोन्याचं मंगळसूत्रच खाऊन टाकलं...
त्याचं झालं असं की, साधना पाटील या मांडवे गावात राहणाऱ्या भावाकडं म्हणजे सुनील खाडेंकडं रक्षाबंधनाच्या सणासाठी आल्या होत्या... रात्री झोपताना त्यांनी चोरांच्या भीतीनं सुमारे दीड लाख रूपये किंमतीचं पाच तोळ्यांचं सोन्याचं मंगळसूत्र जनावरांच्या पेंढीच्या पोत्यात लपवून ठेवलं. सकाळी त्यांना ते पोतं दिसलं नाही... त्यांनी विचारणा केल्यावर म्हशीला पेंढ खायला घातल्याचं खाडेंनी सांगितलं... तेव्हा साधनाताईंच्या काळजाचा ठोकाच चुकला...
म्हशीनं पेंढीबरोबर चक्क मंगळसूत्र गिळलं होतं.. आता काय करायचं, असा प्रश्न खाडेंना पडला... कुणीतरी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावण्याचा सल्ला दिला... म्हशीनं मंगळसूत्र गिळल्याची खात्री पटल्यानंतर खटाव तालुक्याचे पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. नितीन खाडे यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तब्बल दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर म्हशीच्या पोटातून सोन्याचं मंगळसूत्र बाहेर काढण्यात आलं.
शस्त्रक्रियेनंतर आता ही म्हैस सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय... म्हैसही सुखरूप आहे आणि दीड लाख रूपयांचं सोन्याचं मंगळसूत्रही परत मिळालंय... यानिमित्तानं म्हैस या कथेचा नवा भाग लिहिला गेलाय... आणि सध्या त्याचीच चर्चा साताऱ्यात आहे...