हायप्रेशरचा हवेचा पाईप मित्राच्या पार्श्वभागात लावला, तरुणाला मोठ्या प्रमाणात अंतर्गत दुखापत
कंपनीतील मित्राने या तरुणाच्या पार्श्वभागात हायप्रेशरचा हवेचा पाईप लावला. त्यामुळे या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आहे.
चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, अंबरनाथ : कंपनीतील सहकर्मचाऱ्याच्या मस्तीमुळे तरुण जीवन-मरणाशी लढाई लढतोय. कंपनीतील सहकाऱ्याने या तरुणाच्या पार्श्वभागात हायप्रेशरचा हवेचा पाईप लावला. त्यामुळे या तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार मुंबईनजीकच्या अंबरनाथमध्ये (Ambernath) घडला आहे. (a co workers from company inserted a high pressure air pipe into young mans back)
अंबरनाथच्या वडोळ गाव परिसरातल्या एका कंपनीत पीडित तरुण काम करतो. गुरुवारी रात्रीपाळीला हा तरुण कामावर आला होता. हा तरुण शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कंपनीत मशीनवर काम करत होता. तेव्हा त्याचा एक सहकारी मित्र तिथे आला.
तेव्हा त्याने मस्ती म्हणून हवेचा हायप्रेशरचा पाईप या तरुणाच्या पार्श्वभागात लावला. यामुळे ही हायप्रेशरची हवा तरुणाच्या आतड्यांमध्ये गेली. त्यामुळे तरुणाला गंभीर स्वरूपाची अंतर्गत दुखापत झाली. त्यामुळे तो क्षणार्धात खाली कोसळला. यावेळी त्याच्या त्याच मित्राने त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. या तरुणाला तपासण्यात आलं. त्याला तातडीने ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
तसंच त्याची प्रकृती सध्या अतिशय नाजूक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर या तरुणाने हा प्रकार मस्तीत घडला असल्याचं सांगितलं. आपल्याला कोणतीही तक्रार करायची नसल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र या प्रकारामुळे आपली मस्ती एखाद्याच्या कशी जीवावर बेतू शकते, हे समोर आलं आहे.