फक्त E चा A केला आणि घातला 22 लाखांचा गंडा, पुण्यातील चक्रावणारा ऑनलाइन घोटाळा; चक्रावणारी मोडस ऑपरेंडी
Pune Online Scam: ऑनलाइन फसवणूक करण्याची एक नवी पद्धत समोर आली आहे. यावेळी ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी आरोपींनी ई-मेल आयडीचा वापर केला आहे. पुण्यात (Pune) ही घटना घडली असून, एका कंपनीला तब्बल 22 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
Pune Online Scam: तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली आणि माणसाचं आयुष्य सोयीस्कर आणि सोपं होत गेलं. पण ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची एक काळी बाजूही असते, जिचा वापर आपल्या फायद्यासाठी आणि दुसऱ्यांची फसवणूक करण्यासाठी केला जातो. ऑनलाइन फसवणूक करताना याच तंत्रज्ञानाचा वापर करत लोकांना लाखो, करोडोचा गंडा घातला जातो. गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी आता लोकांना बऱ्यापैकी माहिती असल्याने लोक सतर्क असतात, पण त्यातही आरोपी नवे मार्ग शोधत असतात. नुकतंच पुण्यात एका कंपनीला फक्त एक अक्षर बदलत कंपनीला 22 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
ई-मेल हा तसा आता प्रत्येकजणच वापरतो. आपल्या खासगी आणि कार्यालयीन कामासाठी लोक ई-मेल वापरत असतात. पण ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांनी आता ई-मेलमध्येही घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे.
नेमकं काय झालं?
पुण्यातील इंजिनिअरिंग कंपनीने फ्रान्समधील एका कंपनीला ऑर्डर दिली होती. ज्याच्या बदल्यात कंपनीने 24 हजार युरोजचं पेमेंटही केलं होतं. पण अनेक दिवस होऊनही डिलिव्हरी झाली नाही, तेव्हा या घोटाळ्याचा खुलासा झाला.
ऑर्डरच्या बदल्यात 22 लाख रुपये
विशेष बाब म्हणजे, फसवणूक करणाऱ्याने ई-मेल आयडीमधील फक्त एका अक्षरात बदल केला होता. ज्यामुळे कंपनीच्या मोठया अधिकाऱ्यांनाही आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं नाही आणि त्यांनी 22 लाखांचं पेमेंट करुन टाकलं.
देण्यात आली मोठी ऑर्डर
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कंपनीने फ्रान्समधील कंपनीला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 51 हजार युरोंची ऑर्डर दिली होती. ई-मेलच्या माध्यमातून ही ऑर्डर देण्यात आली होती.
बँक अकाऊंटमध्ये केला बदल
फ्रान्समधील कंपनीने Pro-Forma इनवॉइस पाठवत ही ऑर्डर नक्की केली. यानंतर पुण्यातील कंपनीला एक ई-मेल मिळतो ज्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की, फ्रान्समधील नियमित बँक अकाऊंट आणि स्विफ्ट कोड अॅक्सेस होत नाही आहे. यावेळी त्यांना एका नव्या बँक अकाऊंटची माहिती देत, त्यावर पेमेंट करण्यास सांगण्यात आलं.
नव्या बँक अकाऊंटची दिली माहिती
पुण्यातील कंपनीने या ई-मेलवर विश्वास ठेवला आणि अतिरिक्त पेमेंट म्हणून 24 हजार 589 युरोंचं पेमेंट केलं. काही आठवड्यांनी कंपनीने डिलिव्हरीसंबंधी विचारणा केली असता अद्याप पेमेंट झालं नसल्याचं सांगण्यात आलं.
E च्या जागी A चा वापर
प्रकरणाचा तपास केला असता समोर आलं की, आपली फसवणूक झाली आहे. आपल्या खोट्या बँक अकाऊंटची माहिती देण्यात आली असून, ई-मेल पाठवणाऱ्याने E च्या जागी A चा वापर केला होता हे त्यांना कळालं. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत तक्रार केली.
पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. कंपनीची फसवणूक करणाऱ्याने Man in the middle ट्रिकचा वापर केला. यानंतर हॅकर्सने कंपनीच्या ई-मेलची संपूर्ण माहिती मिळवली आणि त्याच आधारे सगळा सापळा रचला.